* मंडळ अधिकारी गोवर्धन माने 30 हजारांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात
* जमीन नोंद मंजुरीसाठी मागितली होती 50 हजारांची लाच ; महसूल विभागात खळबळ
पनवेल / विशेष प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील पनवेल तहसील कार्यालयातील लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून मंडळ अधिकारी गोवर्धन नाना माने यांना 30 हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर जमीन नोंद मंजूर करून देण्यासाठी आरोपी मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांनी सुरुवातीला तब्बल 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. संबंधित व्यक्तीने एवढी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर तडजोडीअंती 30 हजार रुपयांमध्ये व्यवहार निश्चित करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचण्याचा निर्णय घेतला. 14 मे 2026 रोजी पनवेल येथील शिवाजी चौक परिसरात आरोपी मंडळ अधिकारी गोवर्धन माने यांनी तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच स्विकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. कारवाईदरम्यान आरोपीकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस उपअधीक्षक सरिता भोसेले यांच्या मार्गदर्शनाखाली केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचत आरोपीला अटक केली. दरम्यान, आरोपीविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पनवेल तहसील कार्यालयातील या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सामान्य नागरिकांना साध्या शासकीय कामांसाठीही लाच द्यावी लागत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असताना एसीबीच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
* एसीबीचे नागरिकांना आवाहन :- दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोणत्याही शासकीय कार्यालयात कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी भीती न बाळगता तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा. भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे एसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


Social Plugin