Type Here to Get Search Results !

खोपोली घाणीच्या विळख्यात

* चिंचवली-शेकीन रस्त्यावर अस्वच्छतेचे साम्राज्य

* कर वेळेवर भरा, सुविधा मात्र शून्य ? नागरिकांचा संतप्त सवाल

* कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि उघडी गटारे ; रोगराईचा धोका वाढला

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरातील चिंचवली-शेकीन रस्त्यावर सध्या अस्वच्छतेचे भीषण चित्र पाहायला मिळत असून सर्वत्र कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहर स्वच्छतेसाठी दरवर्षी लाखो-कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखविला जात असला, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

“खोपोली नगर परिषदेचा कारभार म्हणजे दिव्याखाली अंधार,” अशी टीका आता उघडपणे नागरिक करीत आहेत. नगर परिषद प्रशासनातील अधिकारी एसी केबिन, मोठे पगार आणि थाटामाटात व्यस्त असून सामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.


दरम्यान, नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी वेळेवर भरली नाही तर दंड आकारला जातो. मात्र कर भरण्यासाठी नगर परिषद कार्यालयात गेल्यावर “सर्व्हर डाऊन आहे” अशी कारणे देत नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. “नोकरी-धंदा सोडून रोज नगर परिषदेत फेऱ्या मारायच्या का ?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.


भुयारी गटार योजनेअंतर्गत शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले असून पावसाळा तोंडावर असतांना नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. उघडी गटारे, रस्त्यांची दुरवस्था आणि कचऱ्यामुळे साथीच्या रोगांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होत आहे. मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांच्यावरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून “डॉक्टर असलेल्या अधिकाऱ्यांना अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांची जाणीव नाही का ?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. शहरातील वाढती अस्वच्छता, डम्पिंग ग्राउंडमधून होणारे प्रदूषण आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे खोपोलीकरांमध्ये संताप वाढत असून, “आता तरी नगर परिषद प्रशासन जागे होणार का ?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement