* विमानतळ आणि रेल्वे स्थानक नामकरणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला
* सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य व केंद्र सरकारकडे सर्वांचे लक्ष
रायगड / ओमकार नागावकर :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. "नामकरणाचा अधिकार सरकारचा आहे," असे स्पष्ट करीत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली असून आता अंतिम निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घ्यायचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण करण्याच्या मागणीला नव्याने बळ मिळाले आहे.
नवी मुंबईच्या उभारणीसाठी हजारो शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या. अनेकांनी संघर्ष केला, आंदोलने केली आणि विकासासाठी त्यागही केला. या संघर्षाचे प्रतीक म्हणून लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. विविध स्तरांवर आश्वासने देण्यात आली, प्रस्तावांबाबत चर्चा झाली. मात्र अद्याप अधिकृत नामकरणाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.
दरम्यान, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला भारतीय रेल्वेचे जनक म्हणून ओळख असलेल्या जगन्नाथ "नाना" शंकरशेट यांचे नाव देण्याची मागणीही पुन्हा जोर धरू लागली आहे. भारतातील पहिल्या रेल्वेच्या उभारणीत नाना शंकरशेट यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेल्या पहिल्या रेल्वे प्रकल्पासाठी त्यांनी आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर मोठे योगदान दिले होते.
केवळ रेल्वे क्षेत्रच नव्हे तर शिक्षण, महिला शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि सार्वजनिक विकासकामांमध्येही नाना शंकरशेट यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून मुंबई सेंट्रल टर्मिनसला "नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल" किंवा "नाना शंकरशेट टर्मिनस" असे नाव देण्यात यावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटना, इतिहास अभ्यासक आणि नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाने १२ मार्च २०२० रोजी मुंबई सेंट्रल स्थानकाच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविल्याची माहिती समोर आली होती. मात्र सहा वर्षांनंतरही या प्रस्तावावर अंतिम निर्णय झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्रकाशज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी नवी मुंबई विमानतळ नामकरणाबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने २०२५ मध्ये याचिका फेटाळली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही हस्तक्षेप नाकारल्याने हा विषय पूर्णपणे सरकारच्या निर्णयाधिकारात गेला आहे.
स्थानिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल.
रायगड, पनवेल, उरण, नवी मुंबई तसेच मुंबई परिसरात या विषयावर जनभावना तीव्र होत असून आता राज्य आणि केंद्र सरकार जनतेच्या भावनांचा सन्मान करून निर्णय घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Social Plugin