Type Here to Get Search Results !

खोपोली नगरपरिषदेत ‘नाव बदल’ घोटाळ्याचा आरोप

* न्यायासाठी नागरिकाचे आमरण उपोषणाचे रणशिंग

* वडिलोपार्जित मालमत्तेच्या अभिलेखावर परस्पर दुसऱ्याचे नाव चढविल्याचा गंभीर आरोप

* संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

* 1 जून 2026 पासून कुटुंबासह आमरण उपोषणाचा इशारा

खोपोली / विशेष प्रतिनिधी :- खोपोली नगर परिषदेच्या कर विभागातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कोणताही खरेदी-विक्री व्यवहार, नोंदणीकृत दस्तऐवज, मालकी हस्तांतरणाची प्रक्रिया किंवा मूळ मालकाची लेखी संमती नसतांना वडिलोपार्जित मालमत्तेच्या असेसमेंट उताऱ्यावर परस्पर दुसऱ्या व्यक्तीचे नाव चढविण्यात आल्याचा गंभीर आरोप सिद्धार्थनगर येथील रहिवासी शेटप्पा नागप्पा शिंपी यांनी केला आहे.

या प्रकरणामुळे खोपोली नगर परिषदेच्या महसूल आणि कर प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. "जर कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांशिवाय मालमत्तेच्या नोंदी बदलल्या जात असतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या मालकी हक्कांची सुरक्षा नेमकी कुठे आहे ?" असा सवाल आता शहरातून उपस्थित केला जात आहे.


* कायदेशीर प्रक्रिया डावलल्याचा आरोप :- शेटप्पा शिंपी यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिद्धार्थनगर येथील त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता अद्याप त्यांच्या मालकीची असून तिचा कोणताही खरेदी-विक्री व्यवहार झालेला नाही, असे असतांना नगर परिषदेच्या कर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नावावरील असेसमेंट उताऱ्यातून नाव कमी करून सलीम इनायततुल्ला शेख यांचे नाव नोंदविले आहे.


मालमत्तेच्या नाव बदलासाठी खरेदीखत, मालकी हक्काची कागदपत्रे, इंडेक्स-2, संबंधित पक्षांची संमती आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अनिवार्य असते. मात्र अशा कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता ही नोंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

* नियमित कर भरूनही तक्रारींकडे दुर्लक्ष ? :- शिंपी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, ते नियमितपणे घरपट्टी आणि इतर कर भरत आले आहेत. तसेच यापूर्वीही त्यांनी नगर परिषदेला लेखी निवेदन देऊन संबंधित मालमत्ता कोणाच्याही नावावर हस्तांतरित करू नये, अशी विनंती केली होती. मात्र त्यांच्या निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


यामुळे केवळ निष्काळजीपणा नव्हे, तर संबंधित कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून हा प्रकार घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


* 'संगनमत आणि आर्थिक व्यवहार’ असल्याचा संशय :- शिंपी यांनी या संपूर्ण प्रकारामागे संगनमत आणि आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


"शासकीय अभिलेखांमध्ये कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता नाव बदलणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. हा केवळ प्रशासनिक दोष नसून नागरिकांच्या मालकी हक्कांवर गदा आणणारा प्रकार आहे," असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.


* 1 जूनपासून आमरण उपोषण :- या प्रकरणात तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे आणि मालमत्तेच्या उताऱ्यावर पुन्हा मूळ नाव नोंदविण्यात यावे, या मागण्यांसाठी शेटप्पा शिंपी यांनी 1 जून 2026 रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून खोपोली येथील डॉं. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.


उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


* अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे धाव :- या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करीत त्यांनी रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, नगरपालिकेचे उपआयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक आमदार, नगराध्यक्ष आणि खोपोली पोलीस निरीक्षक यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविल्या आहेत.


* नागरिकांमध्ये संताप :- या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. मालमत्तेच्या नोंदींमध्ये कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय बदल होत असतील, तर भविष्यात इतर नागरिकांनाही अशाच प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे खोपोली नगर परिषदेची प्रतिमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून प्रशासन या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश देणार की मौन बाळगणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement