* अपघातानंतर टिप्पर चालकाने काढला पळ
* रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अपघात वाढत असल्याची नागरिकांची तक्रार
नागभीड - चंद्रपूर / प्रतिनिधी :- नागभीड तालुक्यातील बोन्ड परिसरात शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातात एसटी महामंडळाच्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले असून एक महिला व एक पुरुष जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळापूरकडून येणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस (क्र. एमएच 07 सी 9373) बोन्ड परिसरातून जात असतांना समोरून येणाऱ्या टिप्परने तिला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.
अपघातानंतर मोठी गर्दी होताच टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करीत चालकाला ताब्यात घेतले आहे. संबंधित टिप्परवर क्रमांक नसल्याने वृत्त लिहीपर्यंत वाहनाची संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मांढरे पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या अपघातासाठी रस्त्यावरील अतिक्रमणालाही जबाबदार धरले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यालगत कुंपण करून रस्त्याची जागा कमी केल्याने मोठ्या वाहनांना वळण घेताना अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास दुचाकीस्वार व इतर वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
रस्त्यालगतचे अतिक्रमण तातडीने हटवून रस्त्यांची रुंदी पूर्ववत करावी, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात घडू शकतात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Social Plugin