* शहरातील प्रमुख नाले, गटारींची युद्धपातळीवर स्वच्छता
* पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही यासाठी प्रशासन सज्ज
पाचोरा / फिरोज पिंजारी :- आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाचोरा नगर परिषदेकडून शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई व स्वच्छता मोहिमेला वेग देण्यात आला असून शहरातील प्रमुख नाले, गटारी आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांची युद्धपातळीवर साफसफाई सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात नागरिकांना पाणी तुंबणे, दुर्गंधी, डासांची वाढ तसेच आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी नगर परिषद प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली आहे.
नगराध्यक्ष सुनिता किशोर पाटील यांनी नगरपरिषदेत विविध विभागांची आढावा बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. नगराध्यक्ष पाटील यांच्या आदेशानुसार व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी जेसीबी, ट्रॅक्टर, टिपर तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाल्यांमधील गाळ, प्लास्टिक कचरा, झाडेझुडपे व इतर अडथळे हटविण्याचे काम सुरू आहे. मागील पावसाळ्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा नाल्यांच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यावर विशेष भर दिला जात आहे.
विशेषतः शहरातील पाणी साचणारे संवेदनशील भाग, मुख्य रस्त्यालगतचे नाले, बाजारपेठ परिसर, निवासी वस्ती तसेच शाळा आणि सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरातील गटारींची प्राधान्याने स्वच्छता करण्यात येत आहे. नालेसफाईदरम्यान बाहेर काढण्यात आलेला कचरा तात्काळ उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
नगर परिषद आरोग्य विभागातील अधिकारी वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत आहेत. तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी औषध फवारणी व निर्जंतुकीकरणाची कामे देखील हाती घेण्यात आली आहेत.
दरम्यान, नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील यांनी नागरिकांना घरगुती व प्लास्टिक कचरा नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये, असे आवाहन केले आहे. नाल्यांमध्ये कचरा टाकल्यामुळे पाण्याचा निचरा अडथळीत होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता राखून नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


Social Plugin