* एक लाख व्होल्टेजच्या टॉवरला थेट लोखंडी कंपाउंड वेल्डिंग
* खोपोली नगर परिषदेच्या बेजबाबदार कारभारावर संताप
* नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न की प्रशासनाचा निष्काळजीपणा ? आम आदमी पार्टी
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरातील महावीर गार्डन परिसरात नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ करणारा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात भीती, संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महावीर गार्डनच्या लोखंडी कंपाउंडच्या सळ्या थेट उच्चदाब वीज वाहिन्यांच्या टॉवरला वेल्डिंग करण्यात आल्याचे उघड झाल्याने गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे संबंधित टॉवरमधून तब्बल एक लाख व्होल्टेजचा वीजप्रवाह जात असल्याची माहिती समोर येत असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ही गंभीर बाब आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक डॉं. रियाज पठाण यांनी समोर आणत खोपोली नगर परिषदेच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नगर परिषद नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करते की मृत्यूचे सापळे उभारते ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
* पावसाळ्यापूर्वीच धोक्याची घंटा :- महावीर गार्डन परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले नियमित येत असतात. अशा ठिकाणी उच्चदाब विद्युत टॉवरला थेट लोखंडी कंपाउंड जोडण्यात आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर असतांना लोखंडी संरचना आणि उच्चदाब वीजवाहिन्यांचा संपर्क अत्यंत धोकादायक ठरू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत शॉर्टसर्किट, करंट लीक किंवा विद्युत प्रवाह लोखंडी कंपाउंडमध्ये उतरल्यास संपूर्ण परिसरात जीवितहानी होऊ शकते. गार्डनमध्ये खेळणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का ? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
* ही चूक नाही, तर गंभीर निष्काळजीपणा :- आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराला केवळ तांत्रिक चूक नसून गंभीर निष्काळजीपणा म्हटले आहे. संबंधित काम करतांना सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले का ? विद्युत विभागाची परवानगी घेण्यात आली का ? अभियंत्यांनी जागेची पाहणी केली होती का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष गयासुद्दीन खान यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत सांगितले की, नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जाणार नाही. तात्काळ या ठिकाणाची तांत्रिक तपासणी करून संबंधित अभियंते, ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
* मुख्याधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी :- या प्रकरणात भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा जीवितहानी झाल्यास खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील आणि संबंधित अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. तसेच संबंधित अभियंते, ठेकेदार आणि कामास मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
* उद्घाटनात पुढे, पण सुरक्षेच्या प्रश्नावर मौन :- रायगड जिल्हा प्रशासनावरही आम आदमी पार्टीने गंभीर आरोप केले आहेत. खोपोली आणि खालापूर परिसरातील अनेक गंभीर प्रश्नांबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही जिल्हाधिकारी कार्यालयाने दुर्लक्ष केले. उद्घाटन, रिबीन कापणे आणि फोटोसेशनमध्ये अधिकारी पुढे असतात. मात्र नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासन कायम गप्प असते, असा आरोप करण्यात आला.
* खोपोलीकरांमध्ये तीव्र संताप :- महावीर गार्डन परिसरातील नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या जीवाची किंमत प्रशासनासाठी शून्य झाली आहे का ? असा सवाल आता शहरभरातून उपस्थित होत आहे. काही नागरिकांनी तर संबंधित परिसर तातडीने बंद करून स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्युत सुरक्षा विभाग, महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करून अहवाल जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
* आंदोलनाचा इशारा :- या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष गयासुद्दीन खान यांनी दिला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाला आता जाब विचारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
* नागरिकांचा प्रश्न - गार्डन की मृत्यूचा सापळा ? :- एकीकडे शहर सुशोभिकरणाच्या नावाखाली विविध विकासकामे केली जात आहेत, तर दुसरीकडे सुरक्षेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महावीर गार्डन परिसरातील हा प्रकार प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण असल्याचे बोलले जात असून आता संपूर्ण शहराचे लक्ष प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे लागले आहे.


Social Plugin