Type Here to Get Search Results !

रायगड मोहिम RMET-2026 प्रवेश परीक्षा उत्साहात संपन्न

* जवळपास 1500 विद्यार्थ्यांचा सहभाग

* शिवप्रेमी तरुणांनी परिसराला यात्रेचे स्वरूप

चाळीसगाव / प्रतिनिधी :- आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि शिवनेरी फाउंडेशन आयोजित “रायगड मोहिम RMET-2026” प्रवेश परीक्षा रविवार 24 मे रोजी चाळीसगाव येथील तेली समाज मंगल कार्यालय, एम.जी. नगर येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या परीक्षेस जवळपास 1500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिवप्रेमी तरुणांच्या मोठ्या उपस्थितीमुळे परीक्षा परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र, शिवकालीन इतिहास, प्रशासन व्यवस्था, युद्धनीती तसेच स्वराज्याच्या विचारांवर आधारित 50 प्रश्न या परीक्षेत विचारण्यात आले होते. शिवचरित्र आणि स्वराज्याच्या इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


रायगड मोहिमेचे हे सलग सहावे वर्ष असून प्रवेश परीक्षेचे दुसरे वर्ष आहे. शिवाजी महाराजांचा केवळ जयजयकार न होता त्यांच्या विचारांचे आचरण तरुणांच्या जीवनात व्हावे, शिवइतिहासाचा अभ्यास वाढावा तसेच विद्यार्थ्यांना महाराजांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा चाळीसगाव शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांनी सांगितले. जास्तीत जास्त तरुणांना रायगड मोहिमेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.


उत्तरपत्रिका तपासणीनंतर यशस्वी ठरलेल्या पहिल्या 1000 विद्यार्थ्यांना 5 जून ते 7 जून दरम्यान आयोजित रायगड मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांना रायगडावरील ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होता येणार आहे. या मोहिमेसाठी सहभागी विद्यार्थ्यांच्या तब्बल 900 किलोमीटर प्रवासाची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे करण्यात येणार आहे. तसेच रायगड पायथ्याशी निवास, भोजन, आंघोळीची सुविधा आदी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.


आमदार मंगेश चव्हाण आणि नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण हे संपूर्ण मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. परीक्षा कालावधी प्रतिभाताई चव्हाण यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. ही परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी भाजपा शिक्षक आघाडी, भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आमदार मंगेश चव्हाण अंत्योदय जनसेवा कार्यालयातील स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement