* 73 गावे व 258 वाड्यांतील 1 लाख 31 हजार 99 नागरिकांना दिलासा
रायगड-अलिबाग / प्रतिनिधी :- जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 1 जून 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 70 टँकर कार्यरत असून त्याद्वारे 73 गावे व 258 वाड्यांमधील 1 लाख 31 हजार 99 नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व टँकर खासगी स्वरूपातील असून शासकीय टँकर अथवा मदतीचे टँकर कार्यरत नाहीत. सर्वाधिक टंचाईग्रस्त परिस्थिती पेण तालुक्यात असून येथे 9 गावे व 76 वाड्यांसाठी 12 टँकर कार्यरत आहेत. या माध्यमातून 24 हजार 746 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
महाड तालुक्यात 14 गावे व 98 वाड्यांसाठी 9 टँकरद्वारे 27 हजार 620 नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. पनवेल तालुक्यात 10 गावे व 8 वाड्यांसाठी 9 टँकरद्वारे 18 हजार 553 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. कर्जत तालुक्यात 7 गावे व 21 वाड्यांसाठी 13 टँकर, खालापूर तालुक्यात 5 गावे व 9 वाड्यांसाठी टँकर 6, तर माणगाव तालुक्यात 4 गावे व 15 वाड्यांसाठी 5 टँकर कार्यरत आहेत.
याशिवाय अलिबाग तालुक्यात टँकर 3, उरण तालुक्यात 5 वाड्या टँकर 1, सुधागड-पाली तालुक्यात 2 वाड्या टँकर 1, रोहा तालुक्यात 3 गावे टँकर 1, पोलादपूर तालुक्यात 9 गावे व 17 वाड्या टँकर 3, म्हसळा तालुक्यात 6 गावे व 1 वाडी टँकर 5, तसेच श्रीवर्धन तालुक्यात 2 गाव व 6 वाड्यांना टँकर 2 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाईग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


Social Plugin