Type Here to Get Search Results !

पारोळा तालुक्यात कथित भोंदूबाबाचा धुमाकूळ ?

* अंधश्रद्धेच्या नावाखाली आर्थिक फसवणुकीचे आरोप

* भूत-प्रेत, जादूटोणा, चमत्कार आणि ‘हर समस्या का समाधान’च्या दाव्यांनी नागरिकांमध्ये संभ्रम

जळगांव / विशेष प्रतिनिधी :- नाशिक परिसरात ज्योतिष, अंकशास्त्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली झालेल्या कथित गैरप्रकारांमुळे राज्यभरात चर्चा सुरू असतानाच, पारोळा तालुक्यातील एका गावात स्वतःला दैवी व आध्यात्मिक शक्ती प्राप्त झाल्याचा दावा करणाऱ्या एका कथित भोंदूबाबाच्या कारवायांबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या व्यक्तीकडून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे केले जात असून नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक होत असल्याचे आरोप काही ग्रामस्थांनी केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून पारोळा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आदी तालुक्यांतील विविध गावांमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वतःचा प्रभाव निर्माण करीत असल्याचे सांगितले जाते. विशेषतः पाचोरा तालुक्यातील एका मोठ्या गावातील काही नातेवाईकांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क वाढल्याची चर्चा आहे.


* 'भूत-प्रेत’, ‘जादूटोणा’ आणि चमत्कारांचे दावे :- संबंधित व्यक्तीकडून भूत-प्रेत, जादूटोणा, कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी, आजारपण, विवाहातील अडथळे आणि इतर समस्यांवर तात्काळ उपाय असल्याचे दावे केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. "हर समस्या का समाधान" अशा प्रकारच्या आश्वासनांमुळे अनेक नागरिक त्यांच्याकडे आकर्षित होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.


काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, विविध धार्मिक विधी, विशेष पूजा आणि तथाकथित चमत्कारांच्या माध्यमातून लोकांवर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या सर्व दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार अथवा पुरावा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.


* मोठ्या आर्थिक व्यवहारांची चर्चा :- गावात आणि परिसरात संबंधित व्यक्तीमार्फत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. काही नागरिकांनी आपल्या वैयक्तिक समस्या सोडविण्याच्या आशेने मोठी रक्कम खर्च केल्याची चर्चा असून, या व्यवहारांची सत्यता तपासण्याची मागणी होत आहे.


* महिला व ज्येष्ठ नागरिकांबाबतही प्रश्नचिन्ह :- काही नागरिकांनी असा आरोप केला आहे की, मानसिक आधार आणि समस्या निराकरणाच्या नावाखाली महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे काही कुटुंबांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून या बाबींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.


* अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत चौकशीची मागणी :- सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत संबंधित बाबींची पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आणावी, असे मत व्यक्त केले जात आहे.


जर नागरिकांची आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धेचा प्रसार किंवा इतर कोणतेही बेकायदेशीर प्रकार होत असल्याचे आढळून आले, तर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


* प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप नाही :- या प्रकरणाबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली, तरी गावात सुरू असलेल्या चर्चांमुळे वातावरण तापू लागले आहे. आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याचा सखोल तपास करून सत्य नागरिकांसमोर आणावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


दरम्यान, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक ओळखून नागरिकांनी कोणत्याही दाव्यांवर आंधळा विश्वास न ठेवता विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा, असे आवाहनही सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement