* वादळी पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना सावधगिरीचे आवाहन ; पेरणीची घाई न करण्याचा सल्ला
* विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
मुंबई / प्रतिनिधी :- राज्यातील हवामानात हळूहळू बदल होण्यास सुरुवात झाली असून पुढील काही दिवसांत अनेक भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र या पावसाचा नैऋत्य मान्सूनशी कोणताही संबंध नसून, राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. कोकण किनारपट्टीवरही काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
* पूर्व विदर्भात उष्णतेचा प्रभाव कायम :- मे महिन्यात अनुभवलेल्या तीव्र उष्णतेच्या तुलनेत आगामी काळात राज्यातील कमाल तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. मात्र पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये तापमान अद्यापही 40 अंश सेल्सिअसच्या वर राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
* मान्सून अद्याप केरळात दाखल नाही :- नैऋत्य मान्सून अद्याप केरळ किनारपट्टीवर पोहोचलेला नसून, पुढील तीन ते चार दिवसांत केरळ, तमिळनाडू आणि अरबी समुद्राच्या दक्षिण भागात मान्सूनची प्रगती होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
* शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन :- कृषी विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकऱ्यांना विशेष आवाहन करीत पेरणीची घाई करू नये, असे स्पष्ट केले आहे. वादळी पावसाला मान्सून समजून पेरणी केल्यास नुकसान होण्याची शक्यता असल्याने मान्सून स्थिर झाल्यानंतरच शेतीची कामे सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
* विजांच्या कडकडाटावेळी घ्या काळजी :- संभाव्य वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या परिसरात उभे राहणे टाळावे. तसेच स्वतःसह पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
* हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन :- राज्यातील हवामान पुढील काही दिवस अस्थिर राहण्याची शक्यता असून स्थानिक पातळीवर वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.


Social Plugin