Type Here to Get Search Results !

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आयपीएल 2026 वर दबदबा

* टाटा सिएरासह पाच मानाचे पुरस्कार पटकावले

* ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअरचा किताब

* राजस्थानच्या युवा फलंदाजाने रचला इतिहास

मुंबई / प्रतिनिधी :- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2026 चा हंगाम राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने अक्षरशः गाजवला. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने केवळ धावांचा पाऊसच पाडला नाही, तर स्पर्धेतील तब्बल पाच प्रतिष्ठित वैयक्तिक पुरस्कारांवरही नाव कोरले. विशेष म्हणजे एवढ्या कमी वयात एका आयपीएल हंगामात इतके पुरस्कार जिंकणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

* 16 सामन्यांत 776 धावा :- राजस्थान रॉयल्सकडून खेळतांना वैभव सूर्यवंशीने 16 सामन्यांतील 16 डावांत 48.50 च्या सरासरीने आणि तब्बल 237.30 च्या स्ट्राइक रेटने 776 धावा केल्या. त्याच्या खेळीत एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेत त्याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली.


* ऑरेंज कॅपवर वैभवचे नाव :- आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी ऑरेंज कॅप वैभव सूर्यवंशीने पटकावली. त्याने 776 धावा करीत गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल (732 धावा) आणि साई सुदर्शन (722 धावा) यांना मागे टाकले. या पुरस्कारासह त्याला 10 लाख रुपयांची बक्षीसे रक्कम देण्यात आली.


* 'इलेक्ट्रिक सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन’ आणि टाटा सिएरा कार :- संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक स्ट्राइक रेट राखणाऱ्या फलंदाजाला दिला जाणारा ‘इलेक्ट्रिक सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन’ पुरस्कारही वैभवने जिंकला. त्याच्या 237.30 च्या अफलातून स्ट्राइक रेटसमोर फिन ॲलन, प्रियांश आर्य आणि अभिषेक शर्मा यांनाही मागे पडावे लागले. या विशेष पुरस्कारासाठी त्याला आकर्षक टाटा सिएरा कार प्रदान करण्यात आली.


* सर्वाधिक षटकारांचा विक्रम :- वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात तब्बल 72 षटकार ठोकत सर्वाधिक षटकारांचा पुरस्कारही आपल्या नावावर केला. या कामगिरीसाठी त्याला ट्रॉफीसह 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अभिषेक शर्माच्या खात्यात 43 षटकारांची नोंद होती.


* 'इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन’चा मान :- युवा खेळाडूंच्या कामगिरीचा गौरव करणारा ‘इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन’ पुरस्कारही वैभवनेच जिंकला. प्रियांश आर्य आणि प्रिन्स यादव यांना मागे टाकत त्याने हा किताब पटकावला. या पुरस्कारासाठीही त्याला 10 लाख रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली.


* सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला वैभव :- आयपीएलमधील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन’ पुरस्कारही वैभव सूर्यवंशीच्या नावावर गेला. त्याने 436.5 गुण मिळवत पर्पल कॅप विजेता कागिसो रबाडालाही मागे टाकले. या पुरस्कारासाठी त्याला 15 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले.


* वय लहान, कर्तृत्व मोठे :- वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने केलेली ही कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी प्रेरणादायी मानली जात आहे. आयपीएलसारख्या जगातील सर्वात मोठ्या टी-20 स्पर्धेत विक्रमी धावा, धडाकेबाज स्ट्राइक रेट आणि पाच प्रतिष्ठित पुरस्कार जिंकत त्याने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.


आयपीएल 2026 संपल्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या खेळाडूंपैकी वैभव सूर्यवंशी हे नाव आघाडीवर असून, भारतीय क्रिकेटचा भविष्यातील सुपरस्टार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement