Type Here to Get Search Results !

25 वर्षीय व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणाला नाट्यमय वळण

* गळफास की घातपात ? संशयित तरुणीसह लॉजमालक व वेटरविरुद्ध गुन्हा

पाचोरा / प्रतिनिधी :- पाचोरा शहरातील जळगाव रोडवरील एका लॉजमध्ये 25 वर्षीय कापड व्यावसायिकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. गिरड (ता. भडगाव) येथील रहिवासी तथा पाचोरा शहरात रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करणारे रवींद्र संजय मोरे (वय 25) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे.

गुरुवारी (दि. 28 मे) सकाळी लॉजमध्ये रवींद्र मोरे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.


* नातेवाईकांचा घातपाताचा संशय :- घटनेची माहिती मिळताच रवींद्र यांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. "रवींद्र हा आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलणारा मुलगा नव्हता. त्याचा घातपात झाला असावा," असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला.


यावेळी संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी करीत आंदोलनात्मक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर काही नातेवाईकांनी मृतदेह थेट पाचोरा पोलीस ठाण्यात नेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


* महिनाभरापूर्वीच झाला होता साखरपुडा :- या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे रवींद्र मोरे यांचा अवघ्या महिनाभरापूर्वीच साखरपुडा झाला होता. कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असतांना अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुष्याची नवी सुरुवात करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण व्यावसायिकाच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.


* तिघांविरुद्ध गुन्हा :- सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. मात्र प्राथमिक चौकशीदरम्यान काही संशयास्पद बाबी समोर आल्याने शुक्रवारी (दि. 29 मे) या प्रकरणाला नवे वळण मिळाले. पाचोरा पोलिसांनी एका संशयित तरुणीसह संबंधित लॉजचा मालक आणि वेटर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित तरुणी आणि लॉजचालकाला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. वेटरचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.


* व्यापारी वर्तुळात हळहळ :- रवींद्र मोरे हे पाचोरा शहरातील परिचित तरुण व्यावसायिक म्हणून ओळखले जात होते. त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि व्यापारी क्षेत्रातील सक्रिय सहभागामुळे अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अकाली निधनाने व्यापारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


* सखोल तपासाची मागणी :- या प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास करून सत्य बाहेर आणावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणी मोरे कुटुंबीयांसह नागरिकांकडून होत आहे.


दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवाल, मोबाईल कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement