* विराट कोहलीची नाबाद 75 धावांची खेळी ठरली निर्णायक ; गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव
अहमदाबाद / प्रतिनिधी :- आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने दमदार कामगिरी करीत गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीगच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या रंगतदार अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीने बंगळुरूच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
* गुजरातची सावध सुरुवात, सुंदरचा संघर्ष :- नाणेफेक जिंकून बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सची सुरुवात मात्र निराशाजनक ठरली. कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन लवकर बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला.
त्यानंतर जोस बटलर, निशांत सिंधू आणि राहुल तेवतिया यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगळुरूच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांना मोठी भागीदारी उभारता आली नाही. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदर याने जबाबदारी स्विकारत 37 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी केली. अखेरीस गुजरातने 20 षटकांत 8 बाद 155 धावा उभारल्या.
बंगळुरूकडून रसिख सलाम दार याने प्रभावी गोलंदाजी करीत 3 बळी घेतले. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड यांनीही अचूक मारा करीत गुजरातच्या फलंदाजांना मोठी खेळी करू दिली नाही.
* कोहलीचाचा विराट विजय :- 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतांना बंगळुरूने आक्रमक सुरुवात केली. व्यंकटेश अय्यर याने अवघ्या 16 चेंडूत 32 धावांची तुफानी खेळी करीत संघाला वेगवान प्रारंभ करून दिला.
त्यानंतर अनुभवी विराट कोहलीने डावाची सूत्रे हाती घेत संयम आणि आक्रमकतेचा उत्कृष्ट मिलाफ साधला. कोहलीने 42 चेंडूत नाबाद 75 धावांची शानदार खेळी करीत गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याच्या खेळीत आकर्षक चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली.
टिम डेव्हिड यानेही महत्त्वपूर्ण 24 धावांचे योगदान देत कोहलीला उत्तम साथ दिली. गुजरातकडून रशीद खानने 2 बळी घेत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तर कागिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज यांनीही प्रयत्न केले. मात्र विराटच्या भक्कम खेळीसमोर गुजरातचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
* इतिहास रचणारी कामगिरी :- अखेरीस बंगळुरूने 18 षटकांत 5 बाद 161 धावा करीत सामना आपल्या नावावर केला. या विजयासह रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावत नवा इतिहास रचला.
या यशामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सलग दोन वर्षे आयपीएल विजेतेपद मिळवणाऱ्या मोजक्या संघांपैकी एक ठरला आहे. सामन्यानंतर खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांनी जल्लोष करीत या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा केला.


Social Plugin