Type Here to Get Search Results !

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती सांगलीत उत्साहात साजरी

* विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांनी जयंती उत्सवाला लाभली भव्यता

सांगली / अविनाश मुळीक :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त सांगली येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकात भव्य जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तीभावात आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात संपन्न झाला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार, कार्यकर्तृत्व, आदर्श प्रशासन व्यवस्था आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

31 मे 2026 रोजी सकाळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धा, ओवी गायन स्पर्धा तसेच विविध उपक्रमांमध्ये यश संपादन करणाऱ्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते शिल्ड, प्रमाणपत्रे व पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांनी न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी प्रशासन कसे उभारले, समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी कशा प्रकारे कार्य केले तसेच धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेसाठी दिलेले योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली.


जयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, महाप्रसाद, शाहिरी कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर स्मारक परिसरात उत्साहाचे आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.


या भव्य सोहळ्यास आमदार इंद्रजितभाई नाईकवडी, आमदार सुधीरदादा, महापौर धीरज सूर्यवंशी, मनपा आयुक्त संजिता मोहपात्रा, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, उपमहापौर गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती अतुल माने, माजी महापौर संगीताताई खोत, माजी महापौर नितीन सावगावे, विष्णू माने, भाजपा शहराध्यक्ष प्रकाश मामा ढंग, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, आदित्यराजे विजयसिंह पटवर्धन, पृथ्वीराज भैय्या पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


तसेच नगरसेवक राजेश नाईक, दयानंद खोत, दरिबा बंडगर, प्रकाश पाटील, मीनाक्षी पाटील, अश्विनी कोळेकर, वर्षा निंबाळकर, युवराज गायकवाड, सुरेश बंडगर, संजय यमगर, योगिता राठोड, स्मिता यमगर, दीपक वायदंडे, वंदना सायमोते, प्राचार्य आर. एस. चोपडे, उद्योजक पांडुरंग रुपनर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन केले.


* समितीचे नियोजन कौतुकास्पद :- या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन उपमहापौर तथा स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन मगदूम, स्मारक समितीचे सचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, उपाध्यक्ष पोपट सरगर, कार्याध्यक्ष अनिल हजारे, सचिव प्रशांत देशमुख, सहसचिव सनी पुजारी, खजिनदार अजित खरात तसेच समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.


या प्रसंगी समाजबांधव, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि अहिल्यादेवींचे विचार मानणारे हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श विचारांचे अनुसरण करण्याची शपथ घेतली.


राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांनी सामाजिक एकात्मता, संस्कार आणि लोककल्याणाचा संदेश देत सांगली शहरात प्रेरणादायी वातावरण निर्माण केले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement