* ‘आप’चे काळे कपडे परिधान करून धरणे आंदोलन
* कंत्राटदाराला क्लीन चिट, दंडमाफी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप ; निष्पक्ष चौकशीची मागणी
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषद प्रशासनाविरोधात तब्बल 96 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा गंभीर आरोप करीत आम आदमी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री डॉं. रियाज पठाण, शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवार (2 जून) रोजी सकाळी 10 वाजल्यापासून नगर परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काळे कपडे परिधान करून लक्षवेधी धरणे आंदोलन सुरू केले.
आंदोलनकर्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, नगर परिषदेतील संबंधित कामांच्या तांत्रिक बाबींची योग्य चौकशी न करता अपुऱ्या अनुभवाच्या व्यक्तीकडून अहवाल घेऊन संबंधित कंत्राटदाराला क्लीन चिट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कंत्राटदाराकडून काम पूर्ण करण्यात झालेल्या तब्बल 473 दिवसांच्या विलंबाकडे दुर्लक्ष करीत त्याला दंडमाफी देण्यात आल्याने नगर परिषदेच्या आर्थिक हिताचे नुकसान झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) फौजदारी तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. यासोबतच प्रशासनाने यापूर्वी दिलेली आश्वासने लेखी स्वरूपात पूर्ण न केल्याने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
* प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह :- नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आंदोलनकर्त्यांनी या कथित घोटाळ्याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक निधीचा अपव्यय झाला असल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
* शहरातील राजकीय वातावरण तापले :- 96 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचे आरोप, कंत्राटदाराला दिलेली कथित क्लीन चिट आणि विलंब शुल्क माफ करण्याच्या निर्णयामुळे खोपोलीतील राजकीय वातावरण तापले आहे. या आरोपांवर नगर परिषद प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि या प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
* डॉं. रियाज पठाण यांची भूमिका :- यावेळी बोलतांना डॉं. रियाज पठाण यांनी सांगितले की, नगर परिषदेतील आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाला असल्यास दोषींना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. सत्य बाहेर येईपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील.
दरम्यान, आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनामुळे नगर परिषद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून या आरोपांवर अधिकृत भूमिका मांडली जाण्याची नागरिक प्रतीक्षा करीत आहेत.


Social Plugin