Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र तुंगारेश्वर रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप

* दोन कोटींच्या रस्ते कामावर प्रश्नचिन्ह

* निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे भाविकांमध्ये संताप

* कृतिका कन्स्ट्रक्शनवर गंभीर आरोप

* बांधकाम विभागाच्या भूमिकेवरही संशय

वसई / नरेंद्र एच. पाटील :- वसई तालुक्यातील प्रसिद्ध आणि पुरातन श्री क्षेत्र तुंगारेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू असून या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा आरोप भाविकांकडून करण्यात येत आहे. संबंधित कामाकडे बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने भाविकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री क्षेत्र तुंगारेश्वर हे वसई तालुक्यातील प्रमुख धार्मिक स्थळ असून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी चकाचक महादेव मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुमारे दोन ते सव्वादोन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम दोन स्वतंत्र कंत्राटदारांना विभागून देण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एका किलोमीटरच्या कामाची जबाबदारी डहाणू येथील कंत्राटदार श्रेयस पाटील यांच्याकडे असून त्यांनी दर्जेदार पद्धतीने काम सुरू ठेवल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यातील सुमारे एक किलोमीटर रस्त्याचे काम करणाऱ्या कृतिका कन्स्ट्रक्शनच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


भाविकांच्या आरोपानुसार, नियमानुसार रस्त्याची जाडी 20 इंच असणे अपेक्षित असतांना प्रत्यक्षात केवळ 12 ते 14 इंच जाडीचा रस्ता तयार करण्यात येत आहे. अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने दर्जात तडजोड करण्यात आल्याचा आरोप नागरिक आणि भाविकांकडून केला जात आहे.


या संदर्भात काही भाविकांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता राजेश यादव यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र तक्रारीनंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. उलट संबंधित कंत्राटदाराला संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही भाविकांनी केला आहे. या प्रकरणामागे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा परिसरात सुरू असून याबाबत सखोल चौकशीची मागणी होत आहे.


विशेष म्हणजे, या रस्ते कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला माजी आमदार क्षितिज ठाकूर तसेच आमदार विलास तरे उपस्थित होते. त्यामुळे आता सुरू असलेल्या कथित निकृष्ट कामाबाबत लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.


भाविकांनी संबंधित कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून रस्त्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी तसेच शासनाच्या निधीचा अपव्यय रोखावा, अशी मागणी केली आहे.


श्री क्षेत्र तुंगारेश्वर हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असल्याने येथे होणारी विकासकामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने व्हावीत, अशी अपेक्षा भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement