Type Here to Get Search Results !

डिजिटल महाराष्ट्राच्या गप्पा...खोपोलीत मात्र ‘सर्व्हर डाऊन’चे राज्य!

* खोपोली नगर परिषदेच्या ऑनलाईन सेवांचा बोजवारा

* कर भरण्यासाठी हेलपाटे, प्रशासनाविरोधात संताप

खोपोली / प्रतिनिधी :- राज्य शासन डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना राबवत नागरिकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्याचा दावा करीत असतांना, खोपोली नगर परिषदेत मात्र ‘सर्व्हर डाऊन’ हा शब्दच नागरिकांच्या दैनंदिन त्रासाचे प्रतीक बनला आहे. नगर परिषदेच्या ऑनलाईन सेवा वारंवार ठप्प होत असल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, विविध दाखले आणि इतर नागरी सेवा मिळवण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

मागील आठवड्याभरापासून घरपट्टी भरण्यासाठी नगर परिषदेत आलेल्या अनेक नागरिकांना सर्व्हर बंद असल्याचे कारण देत तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. काहींना ऑनलाईन पेमेंट करता आले नाही, तर काहींना पावती मिळण्यास विलंब झाला. परिणामी अनेक नागरिकांना आपली कामे अपूर्ण ठेवून परत जावे लागले.


* कर भरण्यासाठी नागरिकांची धावपळ :- नगर परिषदेकडून नागरिकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन केले जाते. विलंब झाल्यास दंड आकारला जातो. मात्र दुसरीकडे कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आम्ही वेळेत कर भरण्यासाठी येतो, पण नगर परिषदेकडून सेवा वेळेत मिळत नाहीत. मग याची जबाबदारी कोण घेणार ? असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.


* मुख्याधिकारी रजेवर, नागरिकांची निराशा :- सर्व्हर बंद असल्यामुळे कामे रखडल्याने काही नागरिकांनी थेट मुख्याधिकारी यांच्या दालनाकडे धाव घेतली. मात्र मुख्याधिकारी रजेवर असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांची निराशा झाली. त्यानंतर कर विभागात तक्रार मांडल्यानंतर "सर्व्हरची समस्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, त्यावर आमच्या हातात काही नाही," असे उत्तर मिळाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


* ऑनलाईन सुविधा की केवळ दिखावा ? :- नगर परिषदेने डिजिटल सेवांचा मोठा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना अखंड सेवा मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, सर्व्हरची समस्या आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना न होणे यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांच्या अडचणी सोडविण्याऐवजी संबंधित विभागाकडून तांत्रिक कारणे पुढे केली जात असल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत आहे.


* डिजिटल युगातही कागदी कारभाराचा आधार :- ऑनलाईन यंत्रणा वारंवार ठप्प होत असल्यामुळे अनेक नागरिकांना पुन्हा पारंपरिक पद्धतीने कामे करण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे डिजिटल सेवांच्या नावाखाली नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.


* कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी :- खोपोलीकरांनी नगर परिषद प्रशासनाकडे सर्व्हर आणि ऑनलाईन सेवांमधील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना अखंड, विश्वासार्ह आणि पारदर्शक सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार असून, त्यासाठी सक्षम तांत्रिक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.


दरम्यान, खोपोली नगर परिषद या वारंवार उद्भवणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणार की नागरिकांना ‘सर्व्हर डाऊन’चेच उत्तर ऐकत राहावे लागणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement