* नगर परिषदेच्या उपक्रमावर आम आदमी पार्टीचा सवाल
* पर्यावरण दिनाच्या उपक्रमावरून राजकीय वाद
* वेंडिंग मशीन, स्वच्छता आणि प्लास्टिकबंदीवर प्रशासनाला प्रश्न
खोपोली / प्रतिनिधी :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खोपोली नगर परिषदेने "प्लास्टिकला नकार, पर्यावरणाला आधार" या अभियानांतर्गत कापडी पिशव्यांचे वाटप आणि वेंडिंग मशीनद्वारे कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला. मात्र, या उपक्रमाच्या परिणामकारकतेवर आणि अंमलबजावणीवर आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक डॉं. रियाज पठाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
डॉं. पठाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील स्वच्छतेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात असला तरी अनेक भागात कचरा, तुंबलेली गटारे आणि अस्वच्छतेच्या समस्या कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्यक्ष समस्या सोडविण्याऐवजी केवळ जनजागृतीपर उपक्रमांवर भर दिला जात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कापडी पिशव्या विक्रीसाठी बसविण्यात आलेल्या वेंडिंग मशीनबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. जर शहर खरोखरच प्लास्टिकमुक्त करायचे असेल, तर नागरिकांना आणि दुकानदारांना मोफत किंवा अनुदानित दरात कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा विचार का केला जात नाही ? असा सवाल त्यांनी केला.
याशिवाय, वेंडिंग मशीनमधून होणाऱ्या विक्रीचा आर्थिक लाभ कोणाला होणार, या प्रक्रियेत कोणती यंत्रणा किंवा संस्था सहभागी आहे का, याबाबतही पारदर्शकता ठेवण्याची मागणी त्यांनी केली.
डॉं. पठाण यांनी पुढे म्हटले की, प्लास्टिकमुक्तीचा खरा परिणाम साधायचा असेल तर शहरातील हॉटेल्स, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये सुरू असलेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रभावी नियंत्रण आणणे आवश्यक आहे. तसेच प्लास्टिक उत्पादन आणि वापरासंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांनी शहरातील स्वच्छता, पावसाळ्यापूर्वीची तयारी, नाल्यांची साफसफाई आणि संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सुचविले.
दरम्यान, नगर परिषदेच्या उपक्रमाला अनेक नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पर्यावरण संरक्षणासाठी कापडी पिशव्यांचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे या विषयावर प्रशासन आणि विरोधक यांच्यात मतभेद निर्माण झाले असून खोपोलीत "प्लास्टिकमुक्तीचा प्रामाणिक प्रयत्न की कापडी पिशव्यांच्या विक्रीचा नवा प्रयोग ?" यावर चर्चा रंगली आहे.
आता नगर परिषद प्रशासन या टीकेला काय उत्तर देते आणि प्लास्टिकमुक्त खोपोलीच्या दिशेने पुढील कोणती पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Social Plugin