* पाचोरा तालुक्यात चौथी, विद्यालयात द्वितीय आलेल्या चैताली वानखेडेचे यशस्वीतेचे सूत्र
* 96.60 टक्के गुणांसह दहावीत घवघवीत यश, इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत पाचोरा शहरातील कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी चैताली सुनील वानखेडे हिने 96.60 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिला एकूण 500 पैकी 483 गुण मिळाले असून ती पाचोरा तालुक्यात चौथी तर कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालयात द्वितीय आली आहे.विज्ञान व तंत्रज्ञान (Science & Technology) विषयात तिने 100 पैकी 98 गुण तर सामाजिक शास्त्र (Social Science) विषयात 100 पैकी 97 गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे.
चैतालीचे वडील सुनील लक्ष्मण वानखेडे हे महावितरणमध्ये लाईनमन म्हणून कार्यरत आहेत, तर आई भारती सुनील वानखेडे गृहिणी आहेत. तिचा लहान भाऊ नेहाल सुनील वानखेडे नुकताच सहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन सातवीत प्रवेशित झाला आहे.
* मी कधीही टेन्शन घेतले नाही :- 'दैनिक कोकण प्रदेश न्यूज'शी संवाद साधतांना चैतालीने आपल्या यशाचे रहस्य उलगडले. ती म्हणाली, दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असला तरी मी त्याचा कधीही ताण घेतला नाही. मी संपूर्ण वर्षभर रिलॅक्स राहून नियोजनबद्ध अभ्यास केला. अभ्यास आणि परीक्षेचा भार मनावर घेतला नाही. वेळेचे योग्य व्यवस्थापन केले आणि त्याचाच मला फायदा झाला.
* टाईम मॅनेजमेंट हेच यशाचे गमक :- चैतालीने अभ्यासासाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार केले होते. शाळा, क्लासेस, स्वअभ्यास आणि उजळणी यांचा समतोल राखत तिने वर्षभर अभ्यास सुरू ठेवला. ती सांगते, गणितातील सूत्रे, इतिहासातील सन-तारखा आणि महत्त्वाचे मुद्दे लक्षात रहावेत म्हणून मी ते कागदावर लिहून माझ्या नजरेसमोर लावले होते. येता-जाता त्यांच्यावर नजर जात असल्याने ते सहज लक्षात राहत गेले. वाचण्याबरोबरच लिहिण्याचा सराव केल्याने विषय अधिक चांगल्या प्रकारे समजले.
* पेपर जवळ आला की अभ्यास नव्हे, सुरुवातीपासून सातत्य महत्त्वाचे :- आजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना चैताली म्हणाली, दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्वात आधी टेन्शन घेणे बंद केले पाहिजे. सुरुवातीपासून थोडा-थोडा अभ्यास करीत राहिल्यास शेवटच्या क्षणी ओझे वाटत नाही. वेळेचा सदुपयोग करा, वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार अभ्यास करा. रोजचा अभ्यास हा यशाचा सर्वात मोठा मंत्र आहे.
* कुटुंबाचा भक्कम पाठिंबा :- आपल्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे सांगताना चैताली भावूक झाली. माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. मला अभ्यासासाठी लागणाऱ्या वह्या, पुस्तके, स्टेशनरी किंवा इतर साहित्य वेळेवर उपलब्ध करून दिले. अभ्यास करीत असतांना मला कोणीही व्यत्यय आणला नाही. त्यामुळे मी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करू शकले. माझ्या यशात माझ्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे, असे ती म्हणाली.
* विद्यालय आणि शिक्षकांचे विशेष योगदान :- आपल्या विद्यालयाबद्दल बोलतांना चैतालीने कृतज्ञता व्यक्त केली. कै. पी. के. शिंदे माध्यमिक विद्यालय माझ्यासाठी दुसरे घरच आहे. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी मला खूप सहकार्य केले. कोणतीही अडचण आली तर त्यांनी ती संयमाने समजावून सांगितली. अवघड वाटणारे विषयही सोप्या पद्धतीने शिकवले. माझ्या यशामागे विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक आणि मार्गदर्शकांचे मोठे योगदान आहे. मी त्यांची सदैव ऋणी राहीन, असे तिने सांगितले.
* डिजिटल माध्यमांचा मर्यादित पण प्रभावी वापर :- चैतालीने अभ्यासासाठी डिजिटल माध्यमांचा वापर केला, मात्र त्यावर पूर्णपणे अवलंबून राहिली नाही. मी क्लासेस लावल्या होत्या. त्याचा योग्य उपयोग केला. तसेच सराव प्रश्नपत्रिकांचा स्वतंत्र संच घेऊन त्याचा भरपूर सराव केला. त्यामुळे परीक्षेचा आत्मविश्वास वाढला, असे ती म्हणाली.
* आता लक्ष्य JEE आणि CET :- दहावीत यश मिळविल्यानंतर चैतालीने आपले पुढील ध्येय निश्चित केले आहे. मला भविष्यात इंजिनिअर व्हायचे आहे. त्यासाठी मी आतापासूनच JEE Main आणि CET परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करीत आहे. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने मेहनत घेणार आहे, असा निर्धार तिने व्यक्त केला.
* विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यशोगाथा :- दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करतांना चैताली वानखेडे हिने केवळ गुणांची उंची गाठलेली नाही, तर संयम, नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे सिद्ध करून दाखवले आहे. तिची यशोगाथा आजच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणारी आहे.
* 'दैनिक कोकण प्रदेश न्यूज'कडून शुभेच्छा :- दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून पाचोरा तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या चैताली सुनील वानखेडे हिचे 'दैनिक कोकण प्रदेश न्यूज' परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन. तिची इंजिनिअर होण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हावी, JEE आणि CET परीक्षांमध्येही ती उत्तुंग यश संपादन करावी आणि भविष्यात आपल्या कर्तृत्वाने समाजासमोर आदर्श निर्माण करावा, अशा मनःपूर्वक शुभेच्छा.
शब्दांकन - फिरोज पिंजारी (मुख्य संपादक - दै. कोकण प्रदेश न्यूज) 8454886853.
संकलन - रमेश वानखेडे (विशेष प्रतिनिधी - न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन)


Social Plugin