* देवदर्शन, नातेवाईकांच्या भेटी आणि निसर्गसौंदर्याचा समृद्ध अनुभव
कधी देवदर्शन मनाला समाधान देते, कधी नातेवाईकांची भेट आपुलकीची ऊब देते, तर कधी सह्याद्रीचे निसर्ग सौंदर्य जीवनाला नवसंजीवनी देते. सातारा-कोल्हापूर परिसरात कुटुंबासोबत केलेला अलीकडील प्रवास अशाच विविध अनुभवांनी समृद्ध ठरला.
प्रवासाची सुरुवात करवीर नगरी कोल्हापूर येथून झाली. श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिरात भक्तिभावाने दर्शन घेतांना अध्यात्मिक शांततेची अनुभूती मिळाली. मंदिरातील दिव्यता, वास्तुशिल्प आणि भक्तांचा अखंड श्रद्धाभाव मनाला प्रसन्न करून गेला. त्यानंतर रंकाळा तलावाच्या रमणीय परिसरात फेरफटका मारत कोल्हापूरच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला.
यानंतर कणेरी मठ येथे भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेचे दर्शन घडले. पुढे नरसोबाची वाडी आणि औदुंबर येथे श्री दत्तगुरूंच्या दर्शनाने मन भक्तिरसात न्हाऊन निघाले. कृष्णा नदीच्या शांत तीरावर लाभलेले हे आध्यात्मिक क्षण विशेष स्मरणीय ठरले.
या प्रवासातील सर्वात भावनिक टप्पा म्हणजे माझ्या मूळ गावी अर्थात जयराम स्वामींचे वडगाव येथे मुक्काम. बालपणीच्या आठवणी, गावची माती, ओळखीची माणसे आणि जिव्हाळ्याचे संबंध यामुळे मन भरून आले. गावाशी असलेले भावनिक नाते पुन्हा एकदा नव्याने अनुभवता आले.
पाडळी आणि शिरगाव येथे नातेवाईकांच्या भेटी घेत आपुलकीचे क्षण अनुभवले. त्यानंतर कुलदैवत पालीच्या खंडोबा मंदिरात जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले. भक्तिभावाने केलेल्या प्रार्थनेतून आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा लाभली. पुढे चाफळ येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत रामभक्तीचा दिव्य अनुभव मिळाला.
दुसऱ्या दिवशी कुलदैवत हरणाई देवीच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर नागझरी येथील सिद्धनाथ मंदिरात जाऊन आध्यात्मिक समाधान लाभले. वडगाव मुक्कामादरम्यान जयराम स्वामी मंदिर, कृष्णपा स्वामी समाधी आणि प्राचीन महादेव मंदिर येथे दर्शन घेऊन गावातील धार्मिक परंपरा आणि अध्यात्मिक वारसा जवळून अनुभवता आला.
इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्याला भेट देताना स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण झाली. गडावरील मंगळाई देवीचे दर्शन घेतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अभिमान मनात दाटून आला. त्यानंतर सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस्थळी नतमस्तक होत अध्यात्म, राष्ट्रभक्ती आणि संस्कार यांचे अद्वितीय दर्शन घडले.
परतीच्या प्रवासात बोरगाव आणि सायगाव येथे नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मेरूलिंग पर्वतावर पोहोचताच निसर्गाने अक्षरशः भुरळ घातली. धुक्याची चादर पांघरलेले डोंगर, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर आणि महादेव मंदिराचे पवित्र वातावरण मनाला विलक्षण शांतता देऊन गेले.
हा प्रवास केवळ पर्यटन नव्हता...तो श्रद्धेचा, संस्कारांचा, इतिहासाचा, नात्यांचा आणि निसर्गाशी पुन्हा जोडल्या जाण्याचा एक सुंदर अनुभव होता. देवदर्शनातून मिळालेली आध्यात्मिक ऊर्जा, नातेवाईकांच्या भेटीतून मिळालेली आपुलकी, गावाने दिलेली भावनिक ओढ आणि सह्याद्रीने दिलेली निसर्गसंपन्न अनुभूती या सर्व आठवणी आयुष्यभर मनात जपून ठेवाव्याशा वाटतात.
श्रद्धा, इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि आपुलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेला हा प्रवास खऱ्या अर्थाने जीवन समृद्ध करणारा आणि मनाला नवसंजीवनी देणारा ठरला.
* शब्दांकन - दिनकर भुजबळ


Social Plugin