Type Here to Get Search Results !

डिजिटल शिक्षणाच्या दिशेने खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची महत्त्वपूर्ण झेप

* केएमसी कॉलेजच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

खोपोली / प्रतिनिधी :- शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी सांगड घालत विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, प्रशासन, कार्यकारिणी मंडळ आणि समाज यांच्यात अधिक सुसंवाद व पारदर्शकता निर्माण करण्याच्या उद्देशाने खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केएमसी कॉलेजच्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

के. जी. पासून पीएच. डी. पर्यंत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या केएमसी कॉलेजसाठी हे संकेतस्थळ महत्त्वपूर्ण डिजिटल व्यासपीठ ठरणार आहे. प्रवेश प्रक्रिया, विविध अभ्यासक्रमांची माहिती, विभागनिहाय तपशील, निकाल, उपक्रम, सूचना तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली अद्ययावत माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संस्था, विद्यार्थी, पालक आणि समाज यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व सुलभ होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी अध्यक्षीय भाषणात पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी सक्षम शिक्षणसंस्था ही समाजाच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत गरज असल्याचे सांगितले. नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून संस्थेची माहिती अधिक पारदर्शकपणे समाजापर्यंत पोहोचेल आणि आधुनिक शैक्षणिक विकासाच्या उद्दिष्टांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अशा सकारात्मक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेच्या प्रगतीसाठी अध्यक्ष संतोष जंगम, संचालक मंडळ, प्राध्यापक, कर्मचारी आणि सर्व हितचिंतकांचे योगदान मोलाचे असल्याचे नमूद करीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कॉलेजचे प्राचार्य डॉं. मकरंद वझल यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. बदलत्या काळात शिक्षण क्षेत्रात डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर आवश्यक असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना अधिक सक्षम व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था भविष्यातही विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नव्याने सुरू करण्यात आलेले संकेतस्थळ हे त्या दूरदृष्टीचा एक महत्त्वाचा भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


केएमसी कॉलेजच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमास संस्थेचे संचालक दिलीप पोरवाल, जितेश ठक्कर, भास्कर लांडगे, बी. एल. पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रशांत माने, सामाजिक कार्यकर्ते चिंतामण सोनवणे, मनीष खवळे, प्रशांत गोपाळे, संदीप ओव्हाळ, गुरुनाथ साठेलकर, जयंत पाठक, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संकेतस्थळामुळे मिळणारे प्रमुख लाभ :- प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन माहिती, अभ्यासक्रम व विभागनिहाय तपशील, निकाल व शैक्षणिक सूचना, महाविद्यालयीन उपक्रमांची माहिती, विद्यार्थी, पालक आणि संस्थेमधील सुलभ संवाद, पारदर्शक व अद्ययावत माहितीची उपलब्धता, डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

- डॉं. मकरंद वझल, प्राचार्य - केएमसी कॉलेज.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement