Type Here to Get Search Results !

अनुप कृषी सेवा केंद्र : वडिलांच्या स्वप्नांतून उभे राहिलेले विश्वासाचे वटवृक्ष

* 1976 पासून शेतकऱ्यांच्या सेवेत : संघर्ष, जिद्द, गुणवत्ता आणि प्रामाणिकतेच्या बळावर घडलेली सुवर्णमयी यशोगाथा

* शेतकरी हित आणि गुणवत्तेशी आम्ही कधीच तडजोड केली नाही आणि यापुढेही करणार नाही - दिलीप भांडारकर

खादा व्यवसाय केवळ नफ्यासाठी उभा राहत नाही. काही व्यवसायांच्या मुळाशी स्वप्न असते, ध्येय असते, समाजाप्रती बांधिलकी असते आणि पुढच्या पिढ्यांसाठी निर्माण केलेला विश्वास असतो. नगरदेवळा येथील ‘अनुप कृषी सेवा केंद्र’ ही अशीच एक यशोगाथा आहे. आज हे कृषी सेवा केंद्र आपल्या स्थापनेची 50 वर्षे पूर्ण करून सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या सुवर्णक्षणाच्या पार्श्वभूमीवर अनुप कृषी सेवा केंद्राचे संस्थापक दिलीप भांडारकर यांनी ‘दै. कोकण प्रदेश न्यूज’शी संवाद साधतांना संघर्ष, जिद्द, शेतकरी प्रेम आणि गुणवत्तेच्या आधारावर उभ्या राहिलेल्या या प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. 

आज जे काही दिसत आहे, त्याची सुरुवात एका छोट्या स्वप्नातून झाली होती. ते स्वप्न माझे नव्हते, तर माझे वडील पंडित वामन भांडारकर यांचे होते. त्यांना शेतीवर विलक्षण प्रेम होते. शेतकरी हा समाजाचा कणा आहे, या विचारातून त्यांनी मला कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रेरणेतून आणि आशीर्वादातूनच आज अनुप कृषी सेवा केंद्र हा विश्वासाचा वटवृक्ष बनला आहे, असे सांगताना दिलीप भांडारकर भावूक झाले.


* 1976 : संघर्षातून सुरू झालेला प्रवास :- आजच्या आधुनिक कृषी व्यवसायाच्या युगात मागे वळून पाहिले तर 1976 चे दिवस वेगळेच होते. ग्रामीण भागात कृषी सेवा केंद्र सुरू करणे म्हणजे मोठे धाडस मानले जात होते. आर्थिक साधने मर्यादित होती. भांडवल नव्हते. बाजारपेठेतील स्पर्धा आणि अडचणी वेगळ्याच होत्या. मात्र मनात एकच ध्यास होता, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कृषी साहित्य उपलब्ध करून देण्याचा.


एप्रिल 1976 मध्ये अनुप कृषी सेवा केंद्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला अत्यंत कमी भांडवलावर व्यवसायाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेमार्फत मिळालेली मदत, विविध शासकीय योजना आणि समाजातील काही मान्यवरांचे मार्गदर्शन यामुळे या स्वप्नाला हळूहळू आकार मिळू लागला.


त्या काळात माजी मंत्री एम. के. अण्णा पाटील, एमआयडीसीचे तत्कालीन अध्यक्ष भास्कर आप्पा आणि माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी दिलेला विश्वास आणि पाठबळ हा या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला.


* गुणवत्तेवर तडजोड नाही, विश्वासावर उभा व्यवसाय :- दिलीप भांडारकर सांगतात, व्यवसाय वाढविणे महत्त्वाचे होते, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे होते शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणे. सुरुवातीच्या काळात गुणवत्तापूर्ण बियाणे मिळविणे हे मोठे आव्हान होते. आम्ही स्वतः विविध ठिकाणी जाऊन चांगल्या दर्जाचे बियाणे शोधून आणत होतो. शेतकऱ्यांना योग्य दरात आणि चांगल्या गुणवत्तेचे साहित्य मिळावे, हा आमचा एकमेव उद्देश होता.


ते पुढे ठामपणे सांगतात, अनुप कृषी सेवा केंद्राने गेल्या 50 वर्षांत शेतकरी हित आणि गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. आजही नाही आणि भविष्यातही करणार नाही. नफा कमी झाला तरी चालेल, पण शेतकऱ्याचा विश्वास कमी होऊ देणार नाही.


* उद्योजकतेकडून कृषी नेतृत्वाकडे :- व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी दिलीप भांडारकर यांनी शासनाच्या विविध उद्योजकता विकास कार्यक्रमांचा लाभ घेतला. त्यावेळचे एमआयडीसी अध्यक्ष भास्कर आप्पा यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांची उद्योजक प्रशिक्षणासाठी निवड झाली. शासनाकडून चार महिन्यांचे विशेष प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर विविध कृषी आणि उद्योग विषयक प्रशिक्षणांमध्ये सहभाग घेतल्यामुळे व्यवसायाचे स्वरूप अधिक व्यापक झाले.


सर्व आवश्यक परवाने, नोंदणी आणि प्रक्रिया पूर्ण करून अनुप कृषी सेवा केंद्र अधिक संघटित आणि व्यावसायिक पद्धतीने कार्य करू लागले.


* 2000 नंतरचे दशक : आधुनिकतेकडे वाटचाल :- 1976 च्या संघर्षमय सुरुवातीपासून 2000 नंतरच्या आधुनिक कृषी युगापर्यंत अनुप कृषी सेवा केंद्राने स्वतःमध्ये सातत्याने बदल घडवून आणले.


शेतीतील नवीन तंत्रज्ञान, आधुनिक बियाणे, प्रगत खते, कीडनियंत्रण उपाययोजना, पीक व्यवस्थापन आणि कृषी मार्गदर्शन यांचा समावेश करून शेतकऱ्यांना काळानुसार सेवा देण्यात आली. कृषी शिक्षण घेतलेल्या पुढील पिढीच्या सहभागामुळे आधुनिक कृषी विज्ञानाची जोडही मिळाली. यामुळे अनुप कृषी सेवा केंद्र हे केवळ विक्री केंद्र न राहता शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केंद्र बनले.


* हजारो शेतकऱ्यांचा विश्वास :- गेल्या पाच दशकांत हजारो शेतकऱ्यांनी अनुप कृषी सेवा केंद्राशी नाते जोडले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील यशामध्ये या केंद्राचे योगदान राहिले आहे. कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजा ओळखून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे.


ग्राहकांचा वाढता विश्वास, प्रामाणिक व्यवहार आणि सातत्यपूर्ण सेवा यामुळे अनुप कृषी सेवा केंद्राची ओळख जळगाव जिल्ह्याच्या सीमाही ओलांडून व्यापक झाली आहे.


* वडिलांचे स्वप्न, पुढील पिढीची जबाबदारी :- आज भाजप नेते तथा अनुप कृषी सेवा केंद्राचे संचालक प्रणय (मुन्नाभाऊ) दिलीप भांडारकर यांच्या माध्यमातून ही परंपरा पुढे नेली जात आहे. वडिलांनी लावलेले रोपटे आज भक्कम वटवृक्ष बनले असून त्याची मुळे शेतकऱ्यांच्या विश्वासात खोलवर रुजली आहेत.


दिलीप भांडारकर सांगतात, "50 वर्षांचा हा प्रवास आमच्यासाठी अभिमानाचा आहे, पण तो केवळ आमचा नाही. तो हजारो शेतकऱ्यांच्या विश्वासाचा प्रवास आहे. भविष्यातही शेतकरी हित, गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि सेवा या चार तत्त्वांवर आम्ही ठाम राहू."


* सुवर्णमहोत्सवी वर्षाचा संकल्प :- आज सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करतांना अनुप कृषी सेवा केंद्र नव्या जोमाने पुढे वाटचाल करीत आहे. बदलत्या कृषी तंत्रज्ञानासोबत चालत असतानाच शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार कायम आहे. कारण अनुप कृषी सेवा केंद्रासाठी व्यवसाय म्हणजे केवळ व्यवहार नाही, तर शेतकऱ्यांशी जपलेले विश्वासाचे नाते आहे आणि हे नातेच गेल्या 50 वर्षांपासून या संस्थेची खरी ओळख बनले आहे..


वडिलांनी दाखवलेली वाट, शेतकऱ्यांनी दिलेला विश्वास आणि गुणवत्तेची अखंड परंपरा हाच अनुप कृषी सेवा केंद्राच्या यशाचा खरा पाया आहे.

* संकलन & शब्दांकन - फिरोज पिंजारी (8454886853)


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement