* अटीतटीच्या अंतिम सामन्यात बीआरएस वॉरियर्स विजेता; राजपूत रॉयल्सची दमदार कामगिरी
कोराडी - नागपुर / प्रतिनिधी :- महादुला येथील सेवा नंद विद्यालयाच्या मैदानावर आयोजित माँ जगदंबा चषक क्रिकेट स्पर्धा (सीझन-5) उत्साहात पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राजपूत रॉयल्स आणि बीआरएस वॉरियर्स यांच्यात रंगतदार आणि अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत उत्कंठा कायम ठेवणाऱ्या या सामन्यात बीआरएस वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले, तर राजपूत रॉयल्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत उपविजेतेपद मिळविले.
स्पर्धेतील विजेत्या बीआरएस वॉरियर्स संघाला 31 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले, तर उपविजेत्या राजपूत रॉयल्स संघाला 21 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले. राजपूत रॉयल्स संघाचे मालक समाजसेवक रुद्रप्रतापसिंह ठाकुर आणि रणजीत बेलेकर आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे हे दोन्ही मान्यवर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना सातत्याने मदतीचा हात देत असतात.
स्पर्धेदरम्यान रुद्रप्रतापसिंह ठाकुर हे आदिनाथ युवा ब्रिगेडच्या कामानिमित्त देशभर दौऱ्यावर असतानाही त्यांनी आपल्या संघासाठी आवश्यक सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून दिले. याबाबत बोलतांना त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून त्यांना उज्ज्वल भवितव्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा आमचा मुख्य उद्देश आहे. यावेळी सहप्रायोजक रणजीत बेलेकर यांनी संघाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडू आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
राजपूत रॉयल्स संघाचे कर्णधार मिथुन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघाने स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. संघातील दिनेश बिरखेडे, सागर राऊत, अशोक चतुर्वेदी, निर्वाण नवधिंगे, सुमित तलमले, रियाज अहमद, आरिफ, टिपूभाई, संकेत वर्मा, दिलीप यादव, पियूष कापसे, लक्ष्य, राहुल उमप या खेळाडूंनी संघाच्या यशात महत्त्वाचे योगदान दिले. तसेच संघाचे प्रशिक्षक शेखर कान्हारकर यांच्या मार्गदर्शनाचेही सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
या स्पर्धेमुळे परिसरातील युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळाली असून, भविष्यात अशा स्पर्धांमधून अनेक गुणवंत क्रिकेटपटू घडतील, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.


Social Plugin