* हल्दीराम आउटलेटचे नुकसान, मोठी दुर्घटना टळली
कोराडी - नागपूर / मिलिंद गाडेकर :- कोराडी येथील नांदा पुनर्वसन परिसरात ए. एम. सिनेमा आणि हल्दीराम आउटलेटच्या मागील बाजूस साचलेल्या कचऱ्याला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी दुपारी सुमारे 4.25 वाजता घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्दीराम आउटलेटच्या मागील फेन्सिंगलगत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकसह विविध प्रकारचा कचरा साचलेला होता. या कचऱ्याला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. त्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनास्थळाजवळ ए. एम. सिनेमागृह, हल्दीराम आउटलेट तसेच नैवेद्यम हॉटेल असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच महानिर्मिती कंपनी कोराडी तसेच महादुला नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत हल्दीराम आउटलेटच्या काही भागाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र नुकसानाचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
दरम्यान, परिसरात मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, संबंधित यंत्रणांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. नागरिकांनी परिसरातील कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.


Social Plugin