Type Here to Get Search Results !

एक्सप्रेसवेवरील इराणी कॅफेत नियमांचा बोजवारा ?

* MRP दिसते, Expiry Date नाही...प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप

* अन्नसुरक्षा नियमांची पायमल्ली की व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा ?

* अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

खालापूर / खलील सुर्वे :- मुंबई-पुणे एक्सप्रेसवे लगत पाली फाटा परिसरातील एका प्रसिद्ध इराणी कॅफेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, विक्रीसाठी ठेवलेल्या खाद्यपदार्थांवर आवश्यक माहिती नसल्याचा आरोप ग्राहक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे. हजारो प्रवाशांची दररोज वर्दळ असलेल्या या कॅफेमध्ये अनेक खाद्यपदार्थांवर किंमत (MRP) नमूद करण्यात आली असली, तरी उत्पादन दिनांक, पॅकिंग दिनांक, बॅच क्रमांक आणि मुदतअखेर (Expiry Date/Best Before) यासारखी अत्यावश्यक माहितीच गायब असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

या प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप होत असून, "किंमत लिहिणे आठवते, पण मुदतअखेरची तारीख लिहिणे का विसरले जाते ?" असा संतप्त सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.


* खाद्यपदार्थ ताजे की कालबाह्य ? ग्राहक संभ्रमात :- प्रवाशांच्या मते, विक्रीसाठी ठेवलेले पदार्थ नेमके किती दिवसांपूर्वी तयार झाले, ते वापरण्यास सुरक्षित आहेत की नाहीत, याची कोणतीही खात्री ग्राहकांना मिळत नाही. केवळ किंमत नमूद करून खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले जात असल्याने ग्राहक अंधारात राहतात. एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या कुटुंबीय, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्याचे मत व्यक्त होत आहे.


* मेनू वाचा आणि मग ऑर्डर करा :- कॅफेमध्ये ग्राहकांना टेबलवरील काचेच्या आत ठेवलेला मेनू वाचून ऑर्डर देण्यास सांगितले जात असल्याची तक्रार समोर आली आहे. मात्र प्रत्येक ग्राहक सुशिक्षित असेलच असे नाही. सर्वांनाच इंग्रजी अथवा मेनूमधील भाषा समजेल का ? याचा विचार व्यवस्थापनाने केला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्राहकाभिमुख सेवा देण्याऐवजी ग्राहकांनाच दोष दिला जात असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.


* स्वच्छतेबाबतही प्रश्नचिन्ह :- काही ग्राहकांनी कॅफेमधील स्वच्छतेबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर हेडकॅप नसणे, हातात ग्लोव्हज नसणे, तसेच काही कर्मचाऱ्यांचे कपडे अस्वच्छ असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अन्न हाताळतांना आवश्यक असलेले मूलभूत सुरक्षा नियम पाळले जात आहेत का, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) मार्गदर्शक सूचनांचे पालन होत आहे का, याची चौकशी करण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.


* "वेटरचे नाव सांगा" पण ओळखपत्रच नाही :- ग्राहकांनी मुदतअखेरच्या तारखेबाबत विचारणा केली असता, "आमच्याकडे सर्व पदार्थ रोज फ्रेश असतात, कोणत्या वेटरने असे सांगितले त्याचे नाव सांगा," असे उत्तर दिल्याचा आरोप आहे. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र (ID Card) नसतांना त्यांची ओळख ग्राहकांनी कशी पटवायची, असा प्रतिप्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यावर समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीची भूमिका घेतल्याचेही ग्राहकांचे म्हणणे आहे.


* FSSAI नियमांचे उल्लंघन ? :- अन्न सुरक्षा नियमांनुसार विक्रीसाठी ठेवलेल्या पॅकबंद खाद्यपदार्थांवर उत्पादन दिनांक, बॅच क्रमांक, वजन, घटक, उत्पादकाचे नाव आणि मुदतअखेरची माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत संबंधित कॅफेमध्ये नियमांचे पालन होत आहे का, याबाबत शंका निर्माण झाली आहे. जर नियमांचे पालन होत नसेल तर हा केवळ निष्काळजीपणा नसून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.


* अन्न व औषध प्रशासन झोपेत आहे का ? :- दररोज हजारो प्रवासी या कॅफेमध्ये खाद्यपदार्थ खरेदी करतात. अशा महत्त्वाच्या ठिकाणी संभाव्य नियमभंग होत असल्याच्या तक्रारी समोर येत असतांना अन्न व औषध प्रशासनाने अद्याप कोणती कारवाई केली नसल्याची चर्चा सुरू आहे. नियमित तपासण्या होत आहेत का ? झाल्यास त्याचे अहवाल काय आहेत ? आणि ग्राहकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले जात आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


* कारवाई होणार की फाईल बंद होणार ? :- ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर आरोप समोर आल्यानंतर आता संबंधित यंत्रणा काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर नियमांचे उल्लंघन आढळून आले तर संबंधित व्यवस्थापन, कंत्राटदार किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.


मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा देशातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानला जातो. अशा ठिकाणी ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि नियमबद्ध सेवा मिळणे ही केवळ अपेक्षा नसून संबंधित व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. मात्र नफ्याच्या हव्यासापोटी ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड केली जात असेल, तर त्याची चौकशी होणे आणि दोषींवर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement