Type Here to Get Search Results !

शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील राजीनाम्यावर ठाम

* मी राजीनामा मागे घेणारा मावळा नाही

* आमचा स्वाभिमान जिवंत आहे - पाटील 

खालापूर / प्रतिनिधी :- शिवसेना (शिंदे गट) खालापूर तालुका प्रमुख तथा युवा नेते संदेश रोहिदास पाटील यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यास स्पष्ट नकार देत पक्षांतर्गत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. "मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. स्वाभिमानाशी तडजोड करून पदावर राहणार नाही," अशी ठाम भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर संदेश पाटील यांच्याकडे खालापूर तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सुरुवातीपासूनच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी तालुकाभर मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. मात्र, अलीकडे झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या पत्नीला सावरोली पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी नाकारण्यात आली. परिणामी त्यांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही संदेश पाटील यांनी जबाबदारी स्विकारत पक्षासाठी काम सुरू ठेवले. परंतु पक्षातील अंतर्गत मतभेद, कार्यकर्त्यांबाबत होत असलेली उपेक्षा आणि इतर कारणांमुळे त्यांनी वारंवार पक्ष नेतृत्वाकडे पदमुक्त करण्याची मागणी केल्याचे सांगितले.


* विधान परिषद निवडणुकीवरून नाराजी :- कोकण विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थानिक स्तरावर समन्वय साधण्याच्या भूमिकेवरही संदेश पाटील यांनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. "ज्या पक्षाविरोधात वर्षानुवर्षे शिवसैनिकांनी राजकीय संघर्ष केला, त्याच पक्षाच्या उमेदवारासाठी काम करण्याची वेळ नेतृत्वाने आणली आहे. त्यामुळे शिवसैनिक अस्वस्थ आहेत," असे ते म्हणाले.


* कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची खंत :- पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्यांची शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करीत असलो, तरी अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. "कार्यकर्त्यांना पक्षात न्याय मिळत नसेल आणि सामान्य लोकांची कामे होत नसतील, तर अशा पदावर राहण्यात अर्थ नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.


* मनधरणीचे प्रयत्न निष्फळ :- राजीनामा दिल्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून मनधरणीचे प्रयत्न झाले असल्याची माहिती देतांना संदेश पाटील म्हणाले, माझ्यावर विश्वास दाखवून अनेकांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ही जबाबदारी पक्षाने इतर कोणाकडे द्यावी.


* शिंदे गटात अस्वस्थता वाढली ? :- दरम्यान, अमर मिसाळ, संभाजी जगताप आणि संदेश पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कर्जत-खालापूरमधील शिंदे गटात नेमके काय सुरू आहे, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. आगामी निवडणुकांवर या नाराजीचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, कर्जत-खालापूर परिसरातील पक्ष संघटनेवरील नियंत्रणाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राजीनाम्याच्या या घडामोडींमुळे खालापूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, पक्ष नेतृत्व पुढे कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement