* भाजप नेते प्रणय भांडारकर यांच्याकडून पाहणी
* होळ शिवारातील शेतकऱ्यांवर संकटाचे ढग
* लाखो रुपयांचे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी
* महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे सुरू
* शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात संताप
नगरदेवळा / हसीबूर शेख :- नगरदेवळा परिसरात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून हातातोंडाशी आलेल्या बागा जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. होळ, चुंचाळे, पिंपळगाव, निपाणे शिवारात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः केळीच्या बागेला मोठा फटका बसला असून काढणीसाठी तयार असलेली शेकडो केळीची झाडे वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः मातीमोल झाली आहेत.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे परिसरात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, होळ शिवारातील अनेक बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची बाग पूर्णपणे भुईसपाट झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
* महसूल व कृषी विभागाकडून तातडीने पंचनामे :- 31 मे 2026 रोजी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत पाचोरा तहसीलदार व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, 2 जून रोजी नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करण्यात आले. यावेळी तालुका सहाय्यक कृषी अधिकारी वैशाली चव्हाण, तलाठी शिरसा आप्पा तसेच कोतवाल सुधाकर पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली व पंचनामे पूर्ण केले.
* भाजप नेते प्रणय भांडारकर यांच्याकडून पाहणी :- भाजप नेते व अनुप कृषी केंद्राचे संचालक प्रणय (मुन्नाभाऊ) दिलीप भांडारकर व नगरदेवळा माजी उपसरपंच विलास राजाराम पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व शासन स्तरावर योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
* शेतकऱ्यांचे मोठे नुकसान :- वादळामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. आज सकाळी तालुका सहाय्यक कृषी अधिकारी वैशाली चव्हाण, तलाठी शिरसा आप्पा तसेच कोतवाल सुधाकर पाटील तसेच भाजप नेते मुन्नाभाऊ भांडारकर, विलास भामरे यांनी शेतकरी प्रकाश बाळीराम परदेशी, गंगासिंग राधाकिसन सिंग परदेशी, सुनील विठ्ठल परदेशी, अफजल खान फत्ते खान, साहेबराव चिमण पाटील यांच्या शेतात नुकसानीची पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा केली. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
* 2025 च्या भरपाईपासूनही शेतकरी वंचित :- मागील वर्षी मे 2025 मध्ये झालेल्या नैसर्गिक नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याची खंत माजी सरपंच तथा शेतकरी प्रकाश बाळीराम परदेशी आणि शेतकरी अफजल खान फत्ते खान यांनी व्यक्त केली आहे. प्रशासन पंचनामे करते, मात्र प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाही. यावेळी तरी शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
* पंचनाम्यादरम्यान संवेदनहीनतेचा आरोप :- दरम्यान, पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप शेतकरी प्रकाश परदेशी वर्गांकडून करण्यात आला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी, याला काही नुकसान म्हणता का ? दोन-तीन झाडेच तर पडली आहेत, अशा प्रकारची टिप्पणी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या कथित वक्तव्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पंचनामे पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने होण्याऐवजी नुकसान कमी दाखविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
* तातडीच्या मदतीची मागणी :- नैसर्गिक संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणे गरजेचे आहे. केळीच्या बागा, बागायती पिके आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.
महसूल व कृषी विभागाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, त्याचप्रमाणे तहसिलदार यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून एकदा नुकसान झाले आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.



Social Plugin