Type Here to Get Search Results !

देशसेवेतून समाजसेवेकडे...सुभेदार जितेंद्र पाटील यांचा भव्य सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

* सार्वे गावातून काढली भव्य मिरवणूक ; माजी सैनिकांचाही गौरव, मान्यवरांकडून देशसेवेचा गौरवपूर्ण उल्लेख

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- देशसेवेसाठी आयुष्यातील तब्बल 23 वर्षे समर्पित करणारे सार्वे गावाचे सुपुत्र तथा भारतीय सैन्यदलातील सुभेदार जितेंद्र रोहिदास पाटील यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. देशभर विविध ठिकाणी सेवा बजावतांना त्यांनी शांतीदूत म्हणून इस्राईल व सिरीया येथेही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेला सलाम करण्यासाठी सार्वे गावासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुभेदार जितेंद्र पाटील यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल - ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर आयोजित सत्कार सोहळ्यात परिसरातील माजी सैनिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर गिरधर पाटील, भाजप नेते प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ दिलीप भांडारकर, आमदार मंगेश चव्हाण यांचे वडील रमेश नाना चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्य उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रमोद पाटील, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र (रवी बाबा) पाटील, समाधान पाटील, हभप ज्ञानेश्वर माऊली हिंगोणे, माजी नगरसेवक अभिजीत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

* सैनिकाची मुलगी मनस्वीचे भावनिक मनोगत :- कार्यक्रमात सुभेदार पाटील यांची कन्या मनस्वी जितेंद्र पाटील हिने आपल्या वडिलांविषयी भावना व्यक्त करतांना सैनिक कुटुंबाचे आयुष्य, त्याग आणि अभिमान यांचा उल्लेख केला. तिच्या मनोगताने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.


* सैनिकांना कलेक्टरपेक्षाही अधिक मान मिळायला हवा - शुभांगी पाटील :- राज्य उपनेत्या शुभांगी पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, लहानपणापासून देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या जितेंद्र पाटील यांनी ते प्रत्यक्षात साकार केले. सैनिकांना समाजात सर्वोच्च सन्मान मिळायला हवा. जिथे सामान्य नागरिक पोहोचू शकत नाहीत, तिथे सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी उभे असतात. सैनिकांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबियांचा त्यागही तितकाच महत्त्वाचा असतो. आता देशसेवेप्रमाणेच समाजसेवेतही त्यांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


* सैनिकांच्या सत्कारासाठी जात-धर्म लागत नाही -  समाधान पाटील :- समाधान पाटील यांनी सैनिकांचा गौरव करतांना सांगितले की, सैनिकांच्या सन्मानासाठी जात किंवा धर्माची आवश्यकता नसते. आपण सुरक्षित आणि आनंदी जीवन जगतो, कारण सीमांवर सैनिक सतत पहारा देत असतात. सैनिकांना सॅल्यूट करणे आणि त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी नमूद केले.


* शेतकरी, सैनिक आणि शिक्षक सर्वाधिक प्रामाणिक - प्रमोद पाटील :- जिल्हा परिषद माजी सदस्य प्रमोद पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, त्यांच्या वडिलांनीही सैन्यात सेवा बजावली असल्याने सैनिक कुटुंबांच्या त्यागाची त्यांना जाणीव आहे. शेतकरी, सैनिक आणि शिक्षक हे समाजातील सर्वात प्रामाणिक घटक असून देशसेवेपेक्षा मोठे पुण्य दुसरे कोणतेही नाही, असे ते म्हणाले.


* एकुलत्या मुलाला देशसेवेसाठी दिल्याबद्दल मातेला वंदन - प्रणय भांडारकर :- भाजप नेते प्रणय ऊर्फ मुन्नाभाऊ भांडारकर यांनी सुभेदार पाटील यांच्या मातेला वंदन करीत, एकुलत्या मुलाला देशसेवेसाठी पाठविण्याचे धाडस मोठे असल्याचे सांगितले. सैनिकांच्या यशामागे त्यांच्या पत्नीची आणि कुटुंबाचीही मोठी भूमिका असते, असे त्यांनी नमूद केले.


* कुटुंबाचे ऋण कधीच फेडू शकणार नाही - सुभेदार जितेंद्र पाटील :- सत्काराला उत्तर देतांना सुभेदार जितेंद्र पाटील भावूक झाले. त्यांनी 23 वर्षांच्या सेवाकाळातील चांगले-वाईट अनुभव, आव्हाने आणि आठवणींना उजाळा दिला. सेवानिवृत्त झालो असलो तरी सहकाऱ्यांशी आणि समाजाशी असलेले नाते कायम राहील. माझ्या कुटुंबाने दिलेला त्याग आणि साथ यांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही, असे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.


* तरुणांनी सैन्यभरतीकडे वळावे - रावसाहेब पाटील :- जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख  यांनी प्रथम सुभेदार पाटील यांच्या आई-वडिलांना नमन केले. त्यांनी सांगितले की, 23 वर्षे देशसेवा करणे हे साधे काम नाही. आजच्या तरुणांनी सैन्यभरतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. जितेंद्र पाटील यांनी आपल्या अनुभवाचा लाभ तरुणांना देऊन अधिकाधिक युवक सैन्यात दाखल होतील यासाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी केले.


* देशसेवेला गावाचा सलाम :- सुभेदार जितेंद्र रोहिदास पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित हा सोहळा केवळ एका सैनिकाचा सत्कार नव्हता, तर देशसेवेच्या मूल्यांचा गौरव करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा उत्सव ठरला. सार्वे गावाने आपल्या सुपुत्राला दिलेला हा मान भविष्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement