Type Here to Get Search Results !

मृत्यूच्या सापळ्यातील रस्त्यावर टोल वसुली ?

* जुन्या मुंबई-पुणे महामार्गांवरील खोदकामावर संतप्त नागरिकांचा सवाल

* महानगर गॅस कंपनीच्या कामांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खोपोली / खलील सुर्वे :- जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गांवर महानगर गॅस कंपनीकडून सुरू असलेल्या खोदकामामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, या कामांमुळे महामार्गांवर अपघातांचा धोका वाढल्याचा आरोप नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. विविध ठिकाणी रस्ता खोदून तात्पुरत्या स्वरूपात माती टाकून सोडण्यात आल्याने महामार्गांची अवस्था बिकट झाली असून, हा रस्ता आता अक्षरशः "मृत्यूचा सापळा" बनत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडून नियमितपणे टोल वसूल केला जात असतांना, त्याबदल्यात सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी पार पाडली नसल्याचा आरोप होत आहे. खोदकाम केलेल्या अनेक ठिकाणी योग्य डांबरीकरण करण्यात आलेले नाही. तसेच सुरक्षा बॅरिकेड्स, परावर्तक फलक, इशारा चिन्हे किंवा रात्रीच्या वेळी दिसतील अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.


अलीकडील पावसामुळे अनेक ठिकाणी भरावाची माती खचली असून, रस्त्यावर खोलगट भाग आणि धोकादायक खड्डे निर्माण झाले आहेत. याशिवाय कामासाठी वापरण्यात येणारे पाईप आणि इतर साहित्य रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणे टाकून ठेवण्यात आले असल्याने दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी ही परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याची तक्रार वाहनचालकांनी केली आहे.


* टोल घेण्यासाठी तत्पर, सुरक्षित रस्त्यासाठी उदासीन का ? :- या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवर संताप व्यक्त केला आहे. टोल वसुलीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारल्या जातात, मात्र रस्त्याच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.


महामार्गांवर खोदकामासाठी परवानगी देतांना सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का ? कामाची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा नेमकी कुठे आहे ? आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असतांना संबंधित अधिकारी मौन का बाळगत आहेत ? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.


* उच्चस्तरीय चौकशीची मागणी :- आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष गयासुद्दीन खान यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर काम करणाऱ्या कोणत्याही कंपनीला सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे काम होत असल्यास संबंधित कंपनी, कंत्राटदार आणि देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.


* पावसाळ्यात धोका आणखी वाढण्याची शक्यता :- पावसाळा सुरू होत असतांना रस्त्याची ही अवस्था अधिक गंभीर परिणाम घडवू शकते. खचलेले भराव, अपूर्ण दुरुस्ती आणि सुरक्षेचा अभाव यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात अशा त्रुटींमुळे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास संबंधित यंत्रणांवर निष्काळजीपणाबाबत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


* प्रशासन जागे होणार का ? :- टोलच्या नावाखाली नागरिकांकडून लाखो रुपये वसूल केले जात असतांना त्यांना सुरक्षित रस्ता मिळत नसेल, तर हा केवळ हलगर्जीपणाचा नव्हे तर जनतेच्या विश्वासघाताचा प्रकार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. आता तरी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा जाग्या होऊन तातडीने उपाययोजना करतील का, की एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच हालचाल होणार, असा संतप्त सवाल खोपोलीकरांकडून उपस्थित केला जात आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement