* संघटन बळकटी, वैचारिक दिशा आणि नेतृत्व विकासावर मान्यवरांचे मार्गदर्शन
कर्जत / दिनकर भुजबळ :- भारतीय जनता पार्टी रायगड उत्तर जिल्ह्याचा जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्ग कर्जत येथील नक्षत्र फार्म येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गाला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष म्हणजे, अपेक्षित संख्येच्या सुमारे 90 टक्के पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून संघटनाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली.
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशने निश्चित केलेल्या अकरा महत्त्वपूर्ण विषयांवर या प्रशिक्षण वर्गात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. संघटनात्मक बळकटी, पक्षाची विचारधारा, प्रभावी जनसंपर्क, डिजिटल माध्यमांचा वापर, सामाजिक बांधिलकी, नेतृत्व विकास, निवडणूक व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांची भूमिका यांसारख्या विविध विषयांवर मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण वर्गात पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते माधवराव भंडारी, खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे, प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये, प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार, ज्येष्ठ पत्रकार मकरंद मुळे, ज्येष्ठ विचारवंत भरत आमदापुरे, प्रदेश प्रवक्ते गणेश खणकर तसेच आयटी सेलचे समीर गुरव यांनी आपले अनुभव, विचार आणि मार्गदर्शन कार्यकर्त्यांसमोर मांडले.
विविध वक्त्यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीत कार्यकर्त्यांनी अधिक सक्षम, अभ्यासू आणि जनतेशी सातत्याने संपर्कात राहण्याची गरज अधोरेखित केली. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पक्षाची विचारधारा आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संघटनात्मक प्रशिक्षणाचे महत्त्व त्यांनी विशद केले.
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. आगामी काळातील राजकीय आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्य, वैचारिक स्पष्टता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी अशा प्रशिक्षण वर्गांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी संघटन अधिक मजबूत, शिस्तबद्ध आणि जनतेशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Social Plugin