* मिथेनॉल पुरवठा साखळीच्या तपासाला वेग
* भिवंडीतील गोदामावर धडक कारवाई
* संबंधित व्यक्ती व संस्थांवर प्रशासनाचा बडगा
पुणे / प्रतिनिधी :- पुण्यात उघडकीस आलेल्या विषारी दारू प्रकरणानंतर प्रशासनाने कठोर कारवाईची मोहीम सुरू केली असून या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी विशेष लक्ष घातल्याने तपासाला वेग आला आहे. विषारी दारू निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या मिथेनॉलच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी राज्यभर व्यापक तपास मोहीम राबविण्यात येत आहे.
या तपासादरम्यान भिवंडी येथील एका गोदामावर धडक कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात पुण्यात तयार करण्यात आलेल्या विषारी दारूसाठी मिथेनॉलचा पुरवठा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित गोदामाची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी महत्त्वाची कागदपत्रे, व्यवहारांची नोंद, रासायनिक पदार्थांचा साठा तसेच अन्य पुरावे प्रशासनाने जप्त केले आहेत.
प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मिथेनॉलच्या बेकायदेशीर साठवणुकीचा, वापराचा आणि पुरवठ्याचा संपूर्ण तपास सुरू केला आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणत्या व्यक्ती, संस्था किंवा वितरकांचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. तपास यंत्रणांनी पुरवठा साखळीतील प्रत्येक दुव्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, विषारी दारू प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने राज्यातील रासायनिक पदार्थांचा साठा करणारी गोदामे, वितरक, घाऊक विक्रेते आणि पुरवठादार यांच्या तपासणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत राज्यातील विविध भागांत आणखी धडक कारवाया होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीरपणे मिथेनॉलचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
विषारी दारू प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील अनेक धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


Social Plugin