Type Here to Get Search Results !

सेनाबारासहस्त्री श्रीमंत आबासाहेब के. एस. पवार यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सेनाबारासहस्त्री श्रीमंत आबासाहेब के. एस. पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

ग्राम शिक्षण समितीचे मानद चिटणीस शिवनारायण जाधव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य के. एन. काटकर, पर्यवेक्षक वाय. डी. ठाकूर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक हिरालाल महाजन यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


* दानशूर व शिक्षणप्रेमी नेतृत्व :- नगरदेवळेकर सरदार पवार घराण्यातील सेनाबारासहस्त्री परंपरेचे वारसदार असलेले श्रीमंत कृष्णराव शिवराव पवार (के. एस. पवार) यांचा जन्म 18 ऑगस्ट 1941 रोजी जळगाव येथे झाला. बालपणापासूनच अनेक संकटांचा सामना करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगरदेवळा येथे तर पुढील शिक्षण पाचगणी येथील सेंट पीटर्स बॉईज हायस्कूलमध्ये झाले.


वडील श्रीमंत सरदार शिवराव कृष्णराव पवार यांच्या निधनानंतर त्यांचे शिक्षण कोल्हापूरच्या छत्रपती शाहजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी नगरदेवळा येथील जहागिरीची सूत्रे हाती घेतली.


* शिक्षणासाठी दिले मोलाचे योगदान :- आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आबासाहेबांनी सुमारे 40 हजार रुपये किंमतीची जमीन व दोन इमारती नगरदेवळा येथील न्यू इंग्लिश स्कूलला दान दिल्या. त्यानंतर विद्यालयाचे नामकरण 'सरदार शिवराव कृष्णराव पवार हायस्कूल' असे करण्यात आले. गरीब, होतकरू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांना मदत केली. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान आजही स्मरणात ठेवले जाते.


* राजकीय व सामाजिक क्षेत्रातही ठसा :- सन 1978 मध्ये ते नगरदेवळा कापूस उत्पादक सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन झाले. 1979 मध्ये नगरदेवळा जिल्हा परिषद गटातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले. 1979 ते 1997 या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. तसेच 1995 ते 1997 या कालावधीत ते जळगाव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते.


गरजू शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारे दानशूर व दिलदार नेते म्हणून त्यांची ओळख होती. विविध धार्मिक संस्थांना जमिनी दान देऊन तसेच सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.


* पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञ स्मरण :- आबासाहेब पवार यांचे 2 जून 2004 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर नगरदेवळा येथील छत्रीबागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यतिथीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement