* चार महिला, तीन पुरुष सदस्यांसाठी आरक्षण निश्चित
* दोन अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती तर चार सर्वसाधारण जागांचा समावेश
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत पारदर्शक वातावरणात पार पडली. आरक्षण प्रक्रियेत सर्व नियमांचे पालन करण्यात आल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यंदाच्या आरक्षणात एकूण सात जागांपैकी चार जागा महिलांसाठी तर तीन जागा पुरुषांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच आरक्षणामध्ये दोन जागा अनुसूचित जाती (एससी), एक जागा अनुसूचित जमाती (एसटी) आणि चार जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजाच्या लोकसंख्येचा विचार करून संबंधित समाजाचे प्रमाण ज्या प्रभागात अधिक आहे, त्या प्रभागातच त्यांच्यासाठी आरक्षित जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरक्षण प्रक्रियेत लोकसंख्या आणि सामाजिक प्रतिनिधित्वाचा समतोल राखण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून, ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. गावाच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व निवडण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.


Social Plugin