* भपकेबाज विवाहांना फाटा ; इस्लामी तत्त्वांनुसार साधेपणात पार पडला निकाह सोहळा
भडगाव / मुझफ्फर अली सय्यद :- आजच्या काळात विवाह समारंभ म्हणजे लाखो रुपयांचा खर्च, भव्य सजावट, दिखावा आणि आर्थिक ओझे असे समीकरण तयार झाले आहे. प्रतिष्ठेच्या नावाखाली अनेक कुटुंबे कर्जबाजारी होत असतांना भडगाव येथील अग्लो उर्दू हायस्कूल (Anglo Urdu High School) चे मुख्याध्यापक नाजीम बेग मिर्झा सर यांनी आपल्या मुलाचा निकाह अत्यंत साधेपणाने आणि इस्लामी परंपरेनुसार पार पाडत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.
भडगाव शहरात चर्चेचा विषय ठरलेला हा विवाह सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. वधू शाजिया अतिक बेग आणि वर मोहम्मद समी नाजीम बेग मिर्झा यांचा निकाह कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आनंदी आणि धार्मिक वातावरणात पार पडला.
या विवाह सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील साधेपणा आणि सामाजिक संदेश. इस्लाम धर्मात निकाह सोपा, सुलभ आणि कमी खर्चात करण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, सध्या विवाह समारंभ प्रतिष्ठेची स्पर्धा बनत चालल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन नाजीम सर यांनी अनावश्यक खर्च आणि दिखावा यांना पूर्णपणे फाटा देत विवाह सोहळा आयोजित केला.
शिक्षक म्हणून हजारो विद्यार्थ्यांना संस्कारांचे धडे देणाऱ्या नाजीम सर यांनी आपल्या कृतीतूनही समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला. विवाह हा दोन कुटुंबांना जोडणारा पवित्र संस्कार असून तो आर्थिक स्पर्धेचे साधन बनू नये, हे त्यांनी आपल्या वर्तनातून दाखवून दिले. त्यांच्या या निर्णयामुळे उपस्थित नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली असून अनेकांनी त्याचे मनापासून स्वागत केले.
उद्योजक नासिर मिर्झा तसेच हॅट्रिक नगरसेवक आसिमभाऊ मिर्झा यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात सामाजिक सलोखा, आपुलकी आणि कौटुंबिक मूल्यांचे सुंदर दर्शन घडले. धार्मिक परंपरा जपत सर्व व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध आणि साधेपणाने करण्यात आली होती.
यावेळी मुफ्ती शकील साहब, हाफिज युनूस साहिब, हाफिज वसीम अहमद साहिब, हाफिज अकील साहिब, मिर्झा असीम साहब, मिर्झा मुकीम साहब, आसिफ पठाण, नासीर मिर्झा (भिवंडी), हाजी नाझिम साहेब, हाजी झाकीर कुरेशी साहेब, सय्यद इम्रान अली साहब, बब्बू शेठ, हाजी मोहसीन साहब, हाजी रियाजुद्दीन साहब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाजात वाढत चाललेला विवाहातील अवाजवी खर्च, हुंड्याची मानसिकता आणि दिखाव्याची प्रवृत्ती याविरोधात हा निकाह एक सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे. “लग्नातील खर्च कमी करा, मुलीच्या कुटुंबावर अनावश्यक भार टाकू नका आणि साधेपणाला प्राधान्य द्या,” हा संदेश या विवाहातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.
भडगाव शहरात या आदर्श विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत असून नाजीम सर यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. नवदांपत्याला शुभेच्छा देतांनाच अनेकांनी भविष्यातही अशाच साध्या, सुसंस्कृत आणि समाजहिताचा विचार करणाऱ्या विवाहांना प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.


Social Plugin