* बारावीत विज्ञान शाखेत 71.50 टक्के गुण मिळवणाऱ्या कुमुदिनी महाजनची प्रेरणादायी यशोगाथा
* शेतकऱ्याच्या लेकीचे मोठे स्वप्न : सायबर सिक्युरिटी क्षेत्रात करिअर घडवण्याचा निर्धार
बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची पायरी मानली जाते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य, मेहनत, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. अशाच जिद्द, चिकाटी आणि स्वअभ्यासाच्या जोरावर विज्ञान शाखेत 71.50 टक्के गुण मिळवत यश संपादन करणाऱ्या कुमुदिनी सचिन महाजन हिने आजच्या विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.विशेष म्हणजे कुमुदिनीचे आजोबा जयराम महाजन सर हे सरदार एस. के. पवार विद्यालयाचे माजी शिक्षक आहेत. तर तिचे वडील सचिन जयराम महाजन हे शेतकरी असून आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्रं शेतात कष्ट करतात. आईनेही मुलीच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. या कुटुंबाच्या त्याग, परिश्रम आणि विश्वासाच्या बळावर कुमुदिनीने बारावीच्या परीक्षेत यशाची नोंद केली आहे.
* वर्गात शिकवलेले लक्षपूर्वक ऐकले आणि समजून घेतले :- 'दैनिक कोकण प्रदेश न्यूज'शी संवाद साधतांना कुमुदिनीने आपल्या यशाचे रहस्य उलगडले. ती म्हणाली, मी बारावीचे वर्ग नियमितपणे केले. वर्गात शिक्षक जे शिकवत होते ते मी लक्षपूर्वक ऐकत होते आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. फक्त पाठांतरावर भर न देता विषय समजून घेणे महत्त्वाचे असते. त्यामुळे अभ्यास अधिक सोपा वाटू लागला.
* रोज 7 ते 8 तास अभ्यास, सरावालाच दिले प्राधान्य :- कुमुदिनीने वर्षभर नियमित अभ्यासावर भर दिला. ती दिवसातून सात ते आठ तास अभ्यास करीत होती. गृहपाठ वेळेवर पूर्ण करणे, प्रश्नपत्रिकांचा सराव करणे आणि कठीण विषयांवर जास्त वेळ देणे, ही तिच्या अभ्यासाची पद्धत होती.
अभ्यास करतांना काही अडचणी आल्या तर मी युट्युबच्या माध्यमातून त्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच शिक्षकांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेत होते. अवघड विषय किंवा समस्या सोडवण्यासाठी सातत्याने सराव करणे अत्यंत गरजेचे आहे. जितका जास्त सराव, तितका जास्त आत्मविश्वास वाढतो, असे ती सांगते.
* शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यालयाचे सकारात्मक वातावरण :- आपल्या यशामागे विद्यालयातील शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे कुमुदिनीने नमूद केले. आमच्या विद्यालयाचे वातावरण अत्यंत सकारात्मक आणि अभ्यासपूरक आहे. शिक्षक मनापासून शिकवतात. विद्यार्थ्यांना समस्या आल्यास त्या सोडवून देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. विद्यार्थी अभ्यासू असेल तर शिक्षकही त्याच्याकडे अधिक लक्ष देतात. माझ्या विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक आणि मार्गदर्शकांनी मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे, असे ती म्हणाली.
* कुटुंबाचा विश्वास हीच सर्वात मोठी ताकद :- यशामागील प्रेरणेबाबत बोलताना कुमुदिनी भावूक झाली. आई-वडिलांनी माझ्यावर नेहमी विश्वास ठेवला. शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. वडील दिवसरात्रं शेतात कष्ट करतात, त्यामुळे त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. माझ्या मामांनीही परीक्षेबाबत नेहमी सकारात्मक विचार दिले. मात्र मला वाटते की मार्गदर्शन महत्त्वाचे असले तरी शेवटी स्व प्रयत्न, स्व अभ्यास आणि स्वतःवरील विश्वास यालाच सर्वाधिक महत्त्व असते, असे ती म्हणाली.
* विद्यार्थ्यांसाठी मोलाचा संदेश :- आज बारावी किंवा दहावीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश देतांना कुमुदिनी म्हणाली, घरच्यांनी आपल्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात. त्यांनी आपल्याला शिक्षणासाठी योग्य वातावरण दिलेले असते. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव करा, वेळेचे नियोजन करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते.
* सायबर सिक्युरिटी क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न :- आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. बँकिंग, शिक्षण, आरोग्य, उद्योग, शासन आणि सोशल मीडिया या सर्व क्षेत्रांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे सायबर सुरक्षेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. याच क्षेत्रात आपले करिअर घडविण्याचा निर्धार कुमुदिनीने केला आहे.
मला सायबर सिक्युरिटी या क्षेत्रात पदवी घेऊन Cyber Security Analyst बनायचे आहे. माहिती आणि डेटाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. डिजिटल भारत अधिक सुरक्षित करण्यासाठी या क्षेत्रात काम करण्याची माझी इच्छा आहे. हे क्षेत्र भविष्यकाळात मोठ्या संधी उपलब्ध करून देणारे आहे, असे ती आत्मविश्वासाने सांगते.
* परिश्रम, जिद्द आणि स्वविश्वासाची प्रेरणादायी कहाणी :- शेतकरी कुटुंबातील कन्या, नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबाचा विश्वास आणि स्वतःवरील दृढ श्रद्धा यांच्या जोरावर कुमुदिनी महाजन हिने बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. तिची ही यशोगाथा केवळ गुणांपुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांना परिश्रम, शिस्त आणि स्वविश्वासाचे महत्त्व पटवून देणारी आहे.
* 'दैनिक कोकण प्रदेश न्यूज'कडून शुभेच्छा :- बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कुमुदिनी सचिन महाजन हिचे 'दैनिक कोकण प्रदेश न्यूज' परिवाराकडून मनःपूर्वक अभिनंदन. तिने उराशी बाळगलेले सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील करिअरचे स्वप्न पूर्ण व्हावे, उच्च शिक्षणातही ती यशाची नवी शिखरे सर करावी आणि आपल्या कर्तृत्वाने कुटुंब, विद्यालय तसेच परिसराचे नाव उज्ज्वल करावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा.
शब्दांकन - फिरोज पिंजारी (मुख्य संपादक - दै. कोकण प्रदेश न्यूज) 8454886853.



Social Plugin