भाजप नेते तथा अनुप कृषी सेवा केंद्राचे संचालक प्रणय (मुन्नाभाऊ) दिलीप भांडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अनुप कृषी सेवा केंद्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गटातील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळास्तरावर प्रथम ते पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलकाताई भांडारकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुन्नाभाऊ भांडारकर उपस्थित होते. यावेळी विविध गावांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अलकाताई दिलीप भांडारकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करतांना सांगितले की, आजचा सत्कार हा केवळ गुणांचा गौरव नसून तुमच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि पालकांच्या कष्टांचा सन्मान आहे. उच्च शिक्षणासाठी आणि करिअर घडविण्यासाठी तुम्ही शहरी भागात जाल, नवीन वातावरणात वावराल. मात्र, आपल्या गावातील संस्कार, परंपरा आणि ग्रामीण संस्कृती कधीही विसरू नका. आई-वडील, आजी-आजोबा आणि ज्येष्ठांनी दिलेल्या मूल्यांचे जतन करणे हीच खरी प्रगती आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षण, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते. वाईट सवयी, व्यसन आणि चुकीच्या मार्गांपासून दूर राहून चांगल्या विचारांचा स्विकार केला पाहिजे. समाजातील दुर्बल आणि गरजू घटकांना मदतीचा हात देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण आपल्या गावाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सकारात्मक विचार आणि चांगल्या कृतींच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडविण्याची ताकद प्रत्येकामध्ये आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
* शब्दांकन - फिरोज पिंजारी (8454886853)


Social Plugin