* आधुनिक रोपवाटिका व्यवस्थापन, कृषी उद्योजकता आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अनुभव
अकलूज - तांदुळवाडी / प्रतिनिधी :- शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी कृषी औद्योगिक संलग्नता (Agro Industrial Attachment) कार्यक्रमांतर्गत तांदुळवाडी येथील प्रसिद्ध शिवनेरी रोपवाटिकेला शैक्षणिक भेट देत आधुनिक रोपवाटिका व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध भाजीपाला पिके, फळझाडे, फुलझाडे आणि शोभेच्या वनस्पतींच्या रोपनिर्मिती प्रक्रियेची सखोल माहिती देण्यात आली. शेडनेट हाऊसमधील रोपांची वाढ, प्रो-ट्रे पद्धतीने रोप निर्मिती, योग्य माध्यमाचा वापर, सिंचन व्यवस्थापन तसेच दर्जेदार रोपांच्या निर्मितीसाठी आवश्यक निकष याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शिवनेरी रोपवाटिकेचे संचालक बळीराम जाधव, ज्योतीराम जाधव आणि शुभम बळीराम जाधव यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्चाचे व्यवस्थापन, रोपांची विक्री व विपणन, ग्राहकांशी संवाद कौशल्य तसेच कृषी उद्योजकतेतील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी रोपवाटिकेतील दैनंदिन कामकाज, उत्पादन नियोजन आणि व्यवस्थापन प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील आधुनिक व्यवसाय संधी, रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगाराच्या विविध शक्यता समजून घेण्यास मोठी मदत झाली. कृषी शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञानाची जोड मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या शैक्षणिक भेटीसाठी शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे ज्येष्ठ मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील तसेच रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर. जी. नलवडे, कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे आणि संलग्नता नियुक्ती अधिकारी प्रा. एन. बी. गाढवे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
प्रशिक्षणाच्या समारोपावेळी कृषिरत्न सागर पवार, करण खाडे, हर्ष देशमुख, अभिषेक नाईकडे, गजानन भोसले, लखन नलवडे आणि प्रविण बादल यांनी शिवनेरी रोपवाटिकेचे व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


Social Plugin