Type Here to Get Search Results !

लेकीच्या सन्मानासाठी शिवशाही शासन खंबीर

* पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली

* भाटनिमगावातील अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबाला दिला आधार

* आरोपीला कठोर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याची घोषणा

पुणे / प्रतिनिधी :- इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित कुटुंबाला आधार देण्यासाठी शिवशाही शासन व हिंदू मातंग सेनेचे संस्थापक प्रमुख तथा लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पीडित मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी संघटनेच्या वतीने स्विकारण्यात येत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली.

पीडित कुटुंबाशी संवाद साधतांना युवराज दाखले यांनी कुटुंबीयांना धीर देत न्याय मिळवून देण्यासाठी संघटना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासन दिले. तसेच मुलीच्या पुढील शिक्षणासाठी कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.


यावेळी बोलतांना युवराज दाखले म्हणाले की, समाजातील प्रत्येक मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे. पीडित मुलगी ही केवळ एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाची लेक आहे. तिच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी बारावी, महाविद्यालयीन शिक्षण तसेच भविष्यातील शैक्षणिक वाटचालीचा संपूर्ण खर्च शिवशाही शासन व हिंदू मातंग सेना उचलणार आहे.


कुटुंबीयांना मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर मदतीचे आश्वासन देतांना त्यांनी संबंधित प्रकरणात कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच दोषींवर लागू असलेल्या सर्व संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई व्हावी आणि प्रकरणाचा वेगाने निपटारा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.


या भेटीदरम्यान महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा उषामाई कांबळे, सुनील (दादासाहेब) झोंबाडे, इंदापूर तालुका प्रमुख तात्यासाहेब यादव, बाळासाहेब चांदणे तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.


उपस्थितांनी पीडित कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर दिला व न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्यात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या संरक्षणासाठी संघटना सातत्याने कार्यरत राहील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement