Type Here to Get Search Results !

प्लास्टिकला नकार, पर्यावरणाला आधार

* खोपोलीत कापडी पिशव्यांच्या वापरासाठी जनजागृती उपक्रम ; वेंडिंग मशीनद्वारे उपलब्ध होणार पर्यावरणपूरक पर्याय

खोपोली / प्रतिनिधी :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत खोपोली शहरात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्मितीसाठी एक सकारात्मक आणि दूरदृष्टीचा उपक्रम राबविण्यात आला. वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण, प्राणीजीवन आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता खोपोली नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ जनजागृतीपुरता मर्यादित न ठेवता नागरिकांना पर्यावरणपूरक पर्याय सहज उपलब्ध व्हावा यासाठी शहरातील मार्केट परिसरात वेंडिंग मशीनच्या माध्यमातून माफक दरात कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्याचा अभिनव निर्णय घेण्यात आला आहे.


आज प्लास्टिक पिशव्यांचा वाढता वापर ही पर्यावरणासमोरील गंभीर समस्या ठरत आहे. प्लास्टिक सहज नष्ट होत नसल्याने गटारे तुंबणे, जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणे, माती व जलप्रदूषण वाढणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दैनंदिन जीवनात छोटासा बदल करून कापडी पिशव्यांचा स्विकार करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


यावेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांचे विशेष स्वागत करण्यात आले. पर्यावरण संवर्धनामध्ये सामान्य नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येकाने आपल्या स्तरावरून योगदान देणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.


खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे आणि मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांनीही या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करीत प्लास्टिकमुक्त खोपोलीसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.


यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक संदीप पाटील, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील, इनरव्हील क्लब ऑफ खोपोलीची संपूर्ण कार्यकारिणी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साठे, गुरुनाथ साठेलकर, स्वच्छता निरीक्षक गौतम मोरे, शिवा चिन्नास्वामी, शहर समन्वयक भक्ती साठेलकर आदी उपस्थित होते.


या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साठे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. "आज एक कापडी पिशवी स्विकारली, तर उद्या पर्यावरणासाठी मोठे योगदान दिले" हा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत नवी जागरूकता निर्माण करणारा ठरला.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement