Type Here to Get Search Results !

अन्न व औषध प्रशासनात रुजू होताच तुकाराम मुंडे यांचा धडाका!

* अवघ्या 8 दिवसांत राज्यभर 130 ठिकाणी छापे

* 86 आस्थापने सील, 102 आरोपी जेरबंद

मुंबई / दशरथ कांबळे :- राज्यातील धडाडीचे आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच कारवाईचा धडाका लावला आहे. पदभार स्विकारल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत राज्यभर मोठ्या प्रमाणावर छापेमारी करीत भेसळखोर, बनावट औषध विक्रेते, गुटखा तस्कर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल 130 ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून 86 आस्थापनांवर सील ठोकण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान 102 आरोपींना अटक करण्यात आली असून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


* मिथेनॉल, गुटखा, बनावट औषधे आणि भेसळखोरांवर कारवाई :- मुंडे यांच्या नेतृत्वाखाली FDA ने मिथेनॉलचा बेकायदेशीर साठा, गुटखा तस्करी, बनावट औषधांची विक्री, भेसळयुक्त अन्नपदार्थ तसेच ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात व्यापक मोहीम उघडली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.


* तीन दिवसांची विशेष मोहीम : 16 जिल्ह्यांतील 47 आस्थापनांवर धाड :- मे महिन्याच्या अखेरीस सलग तीन दिवस विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत राज्यातील 16 जिल्ह्यांतील 47 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. निकृष्ट, भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करीत FDA ने अन्नसुरक्षेच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे.


* नागरिकांना थेट तक्रारीचे आवाहन :- अन्न व औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे. यासाठी FDA ने विशेष टोल-फ्री क्रमांक आणि ई-मेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.


टोल फ्री क्रमांक : 1800222365

ई-मेल : jc-foodhq@gov.in


भेसळयुक्त अन्नपदार्थ, संशयास्पद औषधे किंवा निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी संबंधित आस्थापनाचा पत्ता, उत्पादनाची माहिती आणि उपलब्ध पुरावे सादर करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


* भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण :- FDA च्या धडक कारवायांमुळे राज्यभरातील भेसळखोर, बनावट औषध उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी तपासण्या सुरू असून आगामी काळात आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


* अन्नसुरक्षेला नवी दिशा :- तुकाराम मुंडे यांच्या आक्रमक कार्यशैलीमुळे अन्न व औषध प्रशासन विभागाला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र दिसत आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी कठोर भूमिका घेत प्रशासनाने "भेसळमुक्त महाराष्ट्र" घडविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावी होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement