* 'दिशा सोहळ्या'त पत्रकारितेच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा जागर
* लोकहित, विकास आणि जनआवाज अधिक बुलंद करण्याचा निर्धार
* मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शिक्षक, उद्योजक व नागरिकांच्या भव्य उपस्थितीत संस्मरणीय शुभारंभ सोहळा
खालापूर / खलील सुर्वे :- सत्य, निर्भीडता, लोकहित आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत गेली अनेक वर्षे जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या 'खालापूर जनसामान्यांची दिशा' या साप्ताहिकाच्या नव्या पर्वाचा शुभारंभ मंगळवार, 28 जुलै 2026 रोजी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, खालापूर येथे अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 'दिशा सोहळा' म्हणून आयोजित या भव्य कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, उद्योजक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साप्ताहिकाच्या नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील होते. त्यांच्या हस्ते साप्ताहिकाच्या नव्या पर्वाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
* पत्रकारिता ही समाज परिवर्तनाची प्रभावी शक्ती :- अध्यक्षीय भाषणात डॉं. सुनील पाटील यांनी पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करतांना सांगितले की, पत्रकारिता ही केवळ बातम्या प्रसिद्ध करण्यापुरती मर्यादित नसून ती समाज परिवर्तनाची प्रभावी चळवळ आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेने नेहमीच सत्तेला प्रश्न विचारत जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले पाहिजे. सत्य, निर्भीडता, पारदर्शकता आणि लोकहित हीच पत्रकारितेची खरी ओळख आहे.
आजच्या डिजिटल युगात वेगवान माहितीबरोबरच विश्वासार्हतेलाही तितकेच महत्त्व असल्याचे सांगत त्यांनी 'खालापूर जनसामान्यांची दिशा' हे साप्ताहिक लोकहिताचे प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
* ग्रामीण प्रश्नांना न्याय देण्याचा निर्धार :- साप्ताहिकाचे संपादक तथा रायगड भूषण डॉं. रवींद्र विष्णू जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करीत साप्ताहिकाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील विकासकामे, प्रशासनातील त्रुटी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने न्याय मिळवून देण्यासाठी निर्भीड, निःपक्ष आणि जबाबदार पत्रकारिता करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, पत्रकारितेचा उद्देश केवळ बातम्या देणे नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे आहे. शासन आणि जनतेतील दुवा म्हणून साप्ताहिक भविष्यात अधिक प्रभावीपणे कार्य करेल.
* मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची उंची वाढली :- कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा संपादक डॉं. रवींद्र जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकारिता, लोकशाही, सामाजिक उत्तरदायित्व, ग्रामीण विकास, शिक्षण, शेती, उद्योग आणि सामाजिक परिवर्तन या विविध विषयांवर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य 'खालापूर जनसामान्यांची दिशा' भविष्यात अधिक ताकदीने करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
* विविध क्षेत्रांतील दिग्गजांची उपस्थिती :- या भव्य सोहळ्यास डॉं. सुनील गोटीराम पाटील, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ रवींद्र मर्दाने, एस. आर. पाटील, ॲंड. मिलिंद सुरावकर, ॲंड. राजदत्त झरकर, ॲंड. रमेश पाटील, अश्विन मेश्राम, ॲंड. शेखर वालेकर, निलेश दिलीप पाटील, वर्षा तुषार जाधव, यशवंत मुसळे, मारुती दासरे, कृष्णा पारंगे, संभाजी पाटील, तुषार तानाजी कांबळे, प्रदीप कांबळे, मोहनशेठ ओसवाल, अतुल पाटील, मनोरमा साळवी, दिलीप पवार, अशोक मोरे, अनंत सिताराम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी व राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकार, संपादक, वार्ताहर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून साप्ताहिकाच्या नव्या पर्वासाठी शुभेच्छा दिल्या.
* जनआवाज अधिक बुलंद करण्याची नवी दिशा :- कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी सध्याच्या बदलत्या पत्रकारितेच्या प्रवाहात विश्वासार्ह आणि लोकाभिमुख पत्रकारितेची गरज अधोरेखित केली. समाजातील दुर्लक्षित घटक, ग्रामीण विकास, प्रशासनातील पारदर्शकता, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि सामाजिक सलोखा या विषयांवर सातत्याने प्रकाश टाकण्याचे काम 'खालापूर जनसामान्यांची दिशा' करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
* संस्मरणीय ठरला 'दिशा सोहळा' :- उत्साह, सामाजिक जाणीव, पत्रकारितेप्रती असलेली बांधिलकी आणि लोकहिताचा दृढ संकल्प अशा वातावरणात पार पडलेल्या 'दिशा सोहळ्या'ने खालापूरच्या पत्रकारितेच्या इतिहासात एक नवे पर्व सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
जनतेचा विश्वास, सत्याचा ध्यास आणि समाजहिताची दिशा या त्रिसूत्रीवर वाटचाल करणारे 'खालापूर जनसामान्यांची दिशा' हे साप्ताहिक भविष्यात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे, लोकशाही मूल्यांचे रक्षण करणारे आणि विकासाचा आवाज बुलंद करणारे प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


Social Plugin