* खासगी न्यूजच्या प्रतिनिधीविरोधात कारवाईची मागणी
* ऑल इंडिया उलेमा बोर्डाची पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार ; धार्मिक सलोखा अबाधित राखण्याचे आवाहन
छ. संभाजीनगर / फिरोज पठाण :- छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक हजरत शाह नवाज शहीद (रह.) दरगाह परिसरात एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचा भंग केल्याचा आरोप करीत ऑल इंडिया उलेमा बोर्ड, महाराष्ट्र यांनी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिस आयुक्तांसह विविध शासकीय विभागांकडे लेखी तक्रारी सादर करण्यात आल्या असून शहरातील धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मोहम्मद शहाबुद्दीन सौदागर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, एका खासगी न्यूज वाहिनीचे प्रतिनिधी बी. एम. राठोड यांनी दरगाहमध्ये प्रवेश करतांना धार्मिक परंपरांचे पालन न करता प्रवेश केला आणि त्यानंतर दरगाहबाबत दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, संबंधित हजरत शाह नवाज शहीद (रह.) दरगाह ही ऐतिहासिक धार्मिक वास्तू असून तिची नोंद सन 1973 च्या सरकारी वक्फ गॅझेटमध्ये तसेच संबंधित अधिकृत नोंदींमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे दरगाह नव्याने उभारण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोहम्मद शहाबुद्दीन सौदागर यांनी सहकाऱ्यांसह दरगाहला भेट देऊन धार्मिक विधी पार पाडले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्त, बेगमपुरा पोलिस ठाणे, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा वक्फ अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या.
तक्रारीमध्ये संबंधित वृत्तवाहिनी आणि प्रतिनिधीविरुद्ध लागू कायद्यांनुसार गुन्हा नोंदवून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांमुळे धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याप्रसंगी दरगाह सय्यद सादातचे मुतवल्ली उस्मान खान, समाजसेवक सय्यद मुबीनुद्दीन, इम्तियाज अब्दुल जब्बार हंगोरा, अय्यूब खान, शेख अजीज ईसा, शेख शाकीर, अब्दुल लतीफ गफूर यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.
* प्रशासनाची अधिकृत भूमिका प्रतीक्षेत :- या प्रकरणी संबंधित वृत्तवाहिनी किंवा पोलिस प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त लिहीपर्यंत उपलब्ध झाली नव्हती. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर वस्तुस्थिती आणि जबाबदारीबाबत अंतिम निष्कर्ष समोर येणार असल्याने, सर्व संबंधित पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


Social Plugin