* सामाजिक कार्यकर्ते धनराज चौधरी यांच्या मुलांचे निर्भेळ यश
नगरदेवळा / प्रतिनिधी :- पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करीत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत गितेश धनराज चौधरी तर सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत धिरज धनराज चौधरी यांनी घवघवीत यश मिळवत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही सख्ख्या भावांनी एकाचवेळी गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
नगरदेवळा येथील ग्राम पंचायत सदस्या कल्पना धनराज चौधरी यांचे नातू व सामाजिक कार्यकर्ते, धडाडीचे युवा नेतृत्व धनराज (आबा) चौधरी यांच्या दोन्ही मुलांनी निर्भेळ यश मिळवले आहे. या यशाबद्दल ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा क्लासेसचे संचालक डॉं. सुनील धनगराळे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा क्लासेसमध्ये गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे दरवर्षी विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन करीत असून या यशामुळे क्लासेसच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. दोन्ही भावांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.


Social Plugin