Type Here to Get Search Results !

चाळीसगावमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार

* दोघांना अटक :  मैत्रिणीला हाताशी धरून अत्याचार केल्याचा आरोप

चाळीसगाव / प्रतिनिधी :- चाळीसगाव शहरात 13 वर्षीय मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीच्या मदतीने हा प्रकार केल्याचा आरोप असून, घटनेनंतर पीडितेला धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. एका अल्पवयीन आरोपी मुलीबाबत कायद्यानुसार स्वतंत्र कार्यवाही करण्यात येत आहे.

पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित मुलगी आपल्या आईसोबत कामाच्या ठिकाणी गेली होती. काम सुरू असतांना पीडितेची आई पाणी भरण्यासाठी घरी गेल्याचे सांगण्यात आले आहे. याचदरम्यान पीडित मुलीची 16 वर्षीय अल्पवयीन मैत्रीण तेथे आली. तिने बहाणा करून पीडितेला महिलांच्या स्वच्छतागृहात नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, त्या ठिकाणी दोन आरोपी आधीपासून उपस्थित होते.


पीडित मुलगी स्वच्छतागृहात आल्यानंतर एका आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. यावेळी पीडितेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता, अल्पवयीन आरोपी मुलीने तिचे तोंड दाबून हात पकडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर दुसऱ्या आरोपीनेही पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केल्याचे तसेच त्यानंतर एका आरोपीने पुन्हा अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


घटनेनंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच अल्पवयीन आरोपी मुलीनेही आपले नाव सांगितल्यास पीडितेला सोडणार नसल्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(i), 64(2)(m), 65(1), 70(2), 351(2), 49, 3(5) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8, 10, 12 आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही प्रौढ आरोपींना अटक केली असून, अल्पवयीन आरोपी मुलीबाबत बाल न्याय व्यवस्थेतील लागू तरतुदींनुसार कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.


या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास परीक्षाविधिन पोलीस अधिकारी सह्याद्री बिरले करीत आहेत. त्यांना पोलीस निरीक्षक अमित मनेल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सहकार्य करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement