* चेअरमन सचिन मोरे व सचिव सुभाष सोमवंशी यांचा सन्मान
बाळद - पाचोरा / दिलीप पाटील :- पाचोरा तालुक्यातील ओम अवधूत दूध उत्पादक सोसायटी, बाळद बु. या संस्थेने दूध संकलन व संस्थात्मक कामकाजात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पाचोरा तालुक्यात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या दूध संस्थांमध्ये ओम अवधूत दूध उत्पादक सोसायटीने प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल संस्थेचे चेअरमन सचिन मोरे व सचिव सुभाष सोमवंशी यांचा प्रमाणपत्र, रोख बक्षीस व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
हा पुरस्कार राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हा संपर्क मंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
दूध उत्पादक संस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून दूध संकलन, उत्पादकांशी समन्वय आणि संस्थेचे दैनंदिन कामकाज प्रभावीपणे पार पाडण्यात ओम अवधूत दूध उत्पादक सोसायटीने केलेल्या कार्याची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली. संस्थेच्या या यशामुळे बाळद गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार अरुण पाटील, जेडीसी बँकेचे चेअरमन संजय पवार, रोहिदास निकम, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, तसेच दूध संघाचे संकलन व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, संचालक मंडळातील सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील विविध दूध संस्थांचे प्रतिनिधी व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचोरा तालुक्यातील दूध उत्पादक संस्थांमध्ये ओम अवधूत दूध उत्पादक सोसायटीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने संस्थेचे पदाधिकारी, दूध उत्पादक सभासद आणि बाळद ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या या गौरवामुळे भविष्यात दूध संकलन व उत्पादकांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments