Type Here to Get Search Results !

नगरदेवळा परिसरातील शेतकऱ्यांचा ‘पीक पेरा’ नोंदीचा प्रश्न ऐरणीवर!

* ऑनलाईन पीक पेरा नोंदवूनही सातबारा उताऱ्यावर नोंद नाही ; दुष्काळी अनुदानासह कापूस विक्रीच्या नोंदणीची चिंता

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा व परिसरातील संपूर्ण शिवारातील शेतकऱ्यांसमोर यंदा पीक पेरा नोंदीबाबत संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्यापूर्वी, तर काही शेतकऱ्यांनी आठ ते पंधरा दिवसांपूर्वी पीक पेरा ऑनलाईन पद्धतीने नोंदविला आहे. मात्र, अद्यापही संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर पीक पेराची नोंद दिसून येत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी पीक पेरा नोंदविल्यानंतर दोन-तीन दिवसांत सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद दिसून येत होती. यंदा मात्र अनेक दिवस उलटूनही नोंद अद्याप झालेली नसल्याने पीक पेरा नोंदीची प्रक्रिया नेमकी कुठे अडली आहे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.


शेतकऱ्यांनी पीक पेरा ऑनलाईन पद्धतीने नोंदविल्यानंतर त्याची पुढील प्रक्रिया महसूल यंत्रणेकडून पूर्ण होऊन सातबारा उताऱ्यावर संबंधित पिकाची नोंद दिसणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात नोंद दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


यंदा पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पीक पेरा नोंदीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी पीक पेरा व संबंधित महसूल नोंदी महत्त्वाच्या ठरू शकतात, अशी शेतकऱ्यांची चिंता आहे. त्यामुळे पीक पेरा ऑनलाईन करूनही सातबारा उताऱ्यावर नोंद न झाल्यामुळे भविष्यात नुकसानभरपाई अथवा दुष्काळी अनुदानाच्या प्रक्रियेत अडचण निर्माण होऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


दरम्यान, यंदाच्या पीक पेरा नोंदीचा परिणाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही शेतकऱ्यांना संबंधित फेडरेशनकडे कापूस विक्रीसाठी नाव नोंदणी करतांना सातबारा उताऱ्यावर कपाशीच्या पिकाची नोंद आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सातबारा उताऱ्यावर कपाशीची नोंदच झाली नसेल तर फेडरेशनकडे नोंदणी कशी करायची आणि त्यानंतर सीसीआयकडे कापूस विक्री कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.


पीक पेरा नोंदवूनही सातबारा उताऱ्यावर नोंद झालेली नसेल तर त्यामागील तांत्रिक अथवा प्रशासकीय कारण स्पष्ट करण्यात यावे. ज्या शेतकऱ्यांचा पीक पेरा यशस्वीपणे नोंदविला गेला आहे, त्यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद कधीपर्यंत होणार, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच काही शेतकऱ्यांचा पीक पेरा अद्याप प्रक्रियेत असेल किंवा काही कारणामुळे नोंद प्रलंबित असेल, तर संबंधित त्रुटी तातडीने दूर करून पीक पेरा नोंद पूर्ण करण्याची प्रक्रिया वेगाने राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


दुष्काळी मदत, नुकसानभरपाई आणि कापूस विक्रीसारख्या बाबींमध्ये पीक पेरा नोंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी महसूल व कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नगरदेवळा व परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


ऑनलाईन पीक पेरा नोंदवून अनेक दिवस झाले, मग सातबारा उताऱ्यावर नोंद कधी होणार ? नोंदणीमध्ये अडचण असेल तर ती दूर कोण करणार ? या प्रश्नावर प्रशासनाकडून तातडीने स्पष्टता मिळणे आवश्यक असल्याची मागणी शेतकरी वर्गांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement